Tuesday, 23 October 2012
Saturday, 13 October 2012
'योद्धा शेतकरी' विमोचन समारंभ
'योद्धा शेतकरी' (www.sharadjoshi.in) या संकेतस्थळाचा विमोचन समारंभ आणि गंगाधर मुटे लिखित "वांगे अमर रहे" या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ वर्धा येथील गुजराती भवनात दिनांक २२ जुलै २०१२ रोजी दुपारी १.०० वाजता संपन्न झाला. संकेतस्थळाचे उद्घाटन पी.टी.आय या वृत्तसंस्थेचे व नवभारत टाईम्सचे माजी अध्यक्ष मा. वेदप्रतापजी वैदीक यांचे हस्ते तर "वांगे अमर रहे" पुस्तकाचे प्रकाशन शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांचे हस्ते, लोकमत, नागपूरचे संपादक मा. सुरेश व्दादशीवार यांचे अध्यक्षतेखाली पार पडले.
व्यासपिठावर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवी देवांग, स्वभापचे अध्यक्ष, माजी आमदार अॅड वामनराव चटप, माजी आमदार आणि स्वभापच्या अध्यक्षा सौ. सरोज काशीकर, शेतकरी संघटनेच्या महिला आघाडी अध्यक्षा सौ. शैलजा देशपांडे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे, स्वभापचे जिल्हाध्यक्ष मधुसूदन हरणे, अॅड दिनेश शर्मा, डॉ. मानवेंद्र काचोळे, अनिल घनवट, गुणवंत पाटील, राम नेवले, अंजली पातुरकर व अन्य पदाधिकारी हजर होते.
**** वर्तमानपत्रातील वृत्त ****
महाराष्ट्र टाईम्स
आजच्या भ्रष्टाचारास नेहरूंचा समाजवादच जबाबदार- जोशी
म. टा. प्रतिनिधी , वर्धा
भ्रष्टाचार हे दुधारी हत्यार आहे. एका लोकपाल विधायकाने हा भ्रष्टाचार एक टक्काही कमी होणार नाही. आजच्या भ्रष्टाचारास नेहरूंचा समाजवादच जबाबदार आहे. त्यांनी सुरू केलेले लायसन्स , परमिट राज हेच याचे मूळ आहे , अशी घणाघाती टीका शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी केले. शहरातील गुजराथी भवनात रविवारी आयोजित शेतकरी संघटनेच्या संकेतस्थळाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मंचावर ज्येष्ठ पत्रकार वेदप्रकाश वेदिक , सुरेश द्वादशीवार , रवी देवांग आणि संकेतस्थळाचे निर्माते गंगाधर मुटे उपस्थित होते. यावेळी वेदप्रकाश वेदिक म्हणाले , आज देशातील दहा कोटी लोकांच्या मनात भ्रष्टाचाराविरोधात उठावाची लाट निर्माण झाली तर सत्तापरिवर्तन होऊ शकते. हे मतांनी नव्हे तर मनानी व्हायला पाहिजे. म्हणून लोकाच्या मनावर राज्य करण्याची लहर आली पाहिजे. आता ते दिवस आले आहेत. हे अलीकडील काही जनआंदोलनातून सिद्ध होते. या आंदोलनाच्या नेत्यांना मात्र राजकीय पक्ष काढून सत्तेत येण्याची घाई झालेली दिसते. नेमकी येथेच ही आंदोलने फसतात. जोशींनीही हा अनुभव घेतला आहे , असेही वेदिक म्हणाले. सुरेश द्वादशीवार म्हणाले , आंदोलनांना विचारांची शक्ती असेल तरच ती उभी होतात. पुढे जातात नाहीतर सोमवारी सुरू झालेले आंदोलन शुक्रवारी दिसत नाही. शरद जोशींच्या शेतकरी आंदोलनाला प्रचंड वैचारिक बळ असल्यानेच ते मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाले.
शेतकरी संघटनेची www.sharadjoshi.in अर्थात ' योद्धा शेतकरी ' या वेबसाईटचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते कळ दाबून करण्यात आले. याप्रसंगी कवी व वर्धा जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गंगाधर मुटे यांच्या ' वांगे अमर रहे ' या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. संचालन पांडुरंग भालशंकर यांनी केले.
*
लोकमत
शेतीवर पोट असणार्यांनाच शेतकर्यांच्या वेदना कळतात - शरद जोशी
वर्धा। दि. २२ (शहर प्रतिनिधी)
भारताला कृषिप्रधान देश म्हणून ओळखल्या जाते. मात्र याच देशातील शेतकर्यांची दैनावस्था आहे. शेतकर्यांच्या हितासाठी लढण्याचा आव आणणारे अनेक नेते मंडळी आहे. पण ते अद्यापही शेतकर्यांना न्याय मिळवून देऊ शकले नाही. कारण त्यांना शेतकर्यांच्या समस्या कळल्याच नाही. ज्या नेत्याचे वा कार्यकर्त्यांचे पोट शेती व्यवसायावर असेल त्यांनाच शेतकर्यांच्या खर्या वेदना कळतात, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी केले.
स्थानिक गुजराती भवन येथे शेतकरी संघटनेच्या वतीने योद्धा शेतकरी या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून पि.टी.आय.चे माजी अध्यक्ष वेदप्रताप वैदीक तर अध्यक्षस्थानी लोकमतचे संपादक प्रा.सुरेश द्वादशीवार उपस्थित होते. या वेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवी देवांग, स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष वामन चटप, स्वतंत्र भारत पक्ष महिला आघाडीच्या अध्यक्षा सरोज काशीकर, शेतकरी संघटना महिला आघाडी अध्यक्षा शैलेजा देशपांडे, अंजना पाथुरकर, दिनेश शर्मा, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे, स्वभाप जिल्हाध्यक्ष मधुसूदन हरणे आदी मंचावर उपस्थित होते. दीप प्रज्वलन करून या उद्घाटन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरोज काशीकर यांनी केले. जिल्हाध्यक्ष मुटे यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या योद्धा शेतकरी संकेतस्थळाचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मुटे लिखित वांगे अमर रहे या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.
सर्व कार्यकर्त्यांनी हे संकेतस्थळ चालविण्यासाठी मदत करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. द्वादशीवार यांनी शरीराने थकलेल्या पण विचाराने अजूनही तरूण असलेल्या शेतकरी नेत्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी शेतकर्यांनी व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जबाबदारी स्विकारावी असे सांगितले. येत्या ९ ऑगस्टला संघटनेचे कार्यकर्ते नव्या जोमाने शेतकर्यांच्या हक्काच्या लढाईसाठी मैदानात उतरणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवी देवांग यांनी दिली. पटर्वधन यांच्या बासरी वादनातून वैष्णव जन तो या गिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाला शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
पत्रकार वैदिक : ’योद्धा शेतकरी’ संकेतस्थळाचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
वर्धा,ता २२:
शेतकर्यांकरिता शरद जोशींनी उभा केलेला लढा महत्त्वाचा आहे. त्यांचे मौलिक विचार येणार्या काळातही दिशादर्शक ठरतील, असा विश्वास जेष्ठ पत्रकार वेदप्रताप वैदीक (दिल्ली) यांनी श्री. जोशी यांच्या समग्र जीवनकार्य़ावरील ’योद्धा शेतकरी’ संकेतस्थळाच्या येथील उद्घाटन कार्य़क्रमात व्यक्त केला.
येथील गुजरात भवनाच्या सभागृहात आज उद्घाटन समारंभ पार पडला. कार्य़क्रमाला शेतकरी संघट्नेचे सर्वेसर्वा शरद जोशी, जेष्ठ पत्रकार सुरेश व्दादशीवार, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवी देवांग, स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष वामनराव चटप, स्वभापच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सरोज काशीकर, शेतकरी संघटनेच्या महीला आघाडीच्य़ा अध्यक्ष शैलजा देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या संकेतस्थळावर शेतकरी सघंटनेची विविध आंदोलने, छायाचित्र, त्यावरील वृत्तांत, शरद जोशींनी लिहीलेली १७ मराठी, तीन इंग्रजी आणि दोन हिंदी पुस्तके, राज्यसभेतील त्यांची भाषणे, जीवन परिचय आदींचा समावेश आहे
. यावेळी संघटनेचे पदाधिकारी गंगाधर मुटे यांच्या "वांगे अमर रहे" या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात श्री. मुटे यांनी मागील दोन वर्षात लिहिलेल्या वैचारिक लेख, कथा, ललीत लेखनाचे संकलन आहे.
पुढे बोलताना श्री. वैदीक म्हणाले, ’योद्धा शेतकरी’ हे संकेतस्थळ आपण इंग्रजी आणि हिंदी मध्ये सुरू केले. त्यांचा क्रम आधी मराठी, हिंदी आणि इंग्रजी असा असायला हवा होता. सध्या देशात भ्रष्टाचाराच्या काहूर माजले आहे. भ्रष्टाचारावर लगाम लावण्याकरिता कठोर पावले उचलण्यात आली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी विविध मान्यवरांनी विचार व्यक्त केले. संचालन पांडुरंग भालशंकर यांनी केले. प्रास्तविक सरोज काशीकर यांनी केले. शैलजा देशपांडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
*
*
सकाळ
शेतकर्यांसाठी शरद जोशींनी उभारलेला लढा महत्त्वाचा
पत्रकार वैदिक : ’योद्धा शेतकरी’ संकेतस्थळाचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
वर्धा,ता २२:
शेतकर्यांकरिता शरद जोशींनी उभा केलेला लढा महत्त्वाचा आहे. त्यांचे मौलिक विचार येणार्या काळातही दिशादर्शक ठरतील, असा विश्वास जेष्ठ पत्रकार वेदप्रताप वैदीक (दिल्ली) यांनी श्री. जोशी यांच्या समग्र जीवनकार्य़ावरील ’योद्धा शेतकरी’ संकेतस्थळाच्या येथील उद्घाटन कार्य़क्रमात व्यक्त केला.
येथील गुजरात भवनाच्या सभागृहात आज उद्घाटन समारंभ पार पडला. कार्य़क्रमाला शेतकरी संघट्नेचे सर्वेसर्वा शरद जोशी, जेष्ठ पत्रकार सुरेश व्दादशीवार, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवी देवांग, स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष वामनराव चटप, स्वभापच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सरोज काशीकर, शेतकरी संघटनेच्या महीला आघाडीच्य़ा अध्यक्ष शैलजा देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या संकेतस्थळावर शेतकरी सघंटनेची विविध आंदोलने, छायाचित्र, त्यावरील वृत्तांत, शरद जोशींनी लिहीलेली १७ मराठी, तीन इंग्रजी आणि दोन हिंदी पुस्तके, राज्यसभेतील त्यांची भाषणे, जीवन परिचय आदींचा समावेश आहे
. यावेळी संघटनेचे पदाधिकारी गंगाधर मुटे यांच्या "वांगे अमर रहे" या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात श्री. मुटे यांनी मागील दोन वर्षात लिहिलेल्या वैचारिक लेख, कथा, ललीत लेखनाचे संकलन आहे.
पुढे बोलताना श्री. वैदीक म्हणाले, ’योद्धा शेतकरी’ हे संकेतस्थळ आपण इंग्रजी आणि हिंदी मध्ये सुरू केले. त्यांचा क्रम आधी मराठी, हिंदी आणि इंग्रजी असा असायला हवा होता. सध्या देशात भ्रष्टाचाराच्या काहूर माजले आहे. भ्रष्टाचारावर लगाम लावण्याकरिता कठोर पावले उचलण्यात आली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी विविध मान्यवरांनी विचार व्यक्त केले. संचालन पांडुरंग भालशंकर यांनी केले. प्रास्तविक सरोज काशीकर यांनी केले. शैलजा देशपांडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
*
लोकशाही वार्ता
शेतीवर पोट असलेले नेतेच शेतकर्यांसाठी लढतात
प्रतिनिधी/ २२ जुलै
वर्धा : भारताला कृषिप्रधान देश म्हणून ओळखले जाते मात्र याच देशातील शेतकर्याची दैनावस्था आहे. शेतकर्यांच्या हितासाठी लढण्याचा आव आणणारे अनेक नेते मंडळी आहे. पण ते अद्यापही शेतकर्यांना न्याय मिळवून देऊ शकले नाही. कारण त्यांना शेतकर्यांच्या समस्या कळल्याच नाही. ज्या नेत्याचे वा कार्यकर्त्यांचे पोट हे शेती व्यवसायावर भरत असेल त्यांनाच शेतकर्यांच्या खर्या वेदना कळतात, समस्येची जाणीव असते आणि तेच शेतकर्यांच्या न्यायासाठी पोटतिडकीने भाग घेऊन लढतात, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी केले.
स्थानिक गुजराती भवनात शेतकरी संघटनेच्या वतीने वर्धा जिल्हाध्यक्ष मुटे यांच्या पुढाकाराने 'योद्धा शेतकरी' या संकेतस्थळाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ पत्रकार पी.टी. आय चे माजी अध्यक्ष वेदप्रतापजी वैदिक तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संपादक प्रा. सुरेश व्दादशीवार उपस्थित होते.
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवी देवांग, स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष वामन चटप, महिला आघाडी स्वभाप अध्यक्षा सरोज काशीकर, शेतकरी संघटना महिला आघाडी अध्यक्षा शैलेजा देशपांडे, अंजना पाथुरकर, दिनेश शर्मा, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे, स्वभाप जिल्हाध्यक्ष मधुसूदण हरणे यांची उपस्थिती होती. प्रास्तविक सरोज काशीकर यांनी केले. जिल्हाध्यक्ष मुटे यांच्या प्रयत्नातून फळाला गेलेल्या योद्धा शेतकरी संकेतस्थळाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मुटे लिखित 'वांगे अमर रहे' या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. उद््घाटनीय भाषणातून महाराष्ट्राच्या भूमीत शरद जोशीसारखे शेतकरी नेते निर्माण होणे म्हणजे अहोभाग्य असल्याचे वैदिक यांनी सांगितले. तर प्रणेते शरद जोशी यांनी या संकेतस्थळाची कल्पना पूर्वीपासूनच मनात होती परंतु काही कारणास्तव पूर्ण होऊ शकली नाही म्हणूनच शेतकरी संघटनेला व नेत्यांना इतर नेत्यांप्रमाणे महत्त्व प्राप्त झाले नाही. ही संकेतस्थळाची इच्छा मुटे यांनी पूर्णत्वास नेल्याने शेतकरी संघटनेला नवी भरारी मिळाली आहे. यामुळे त्यांनी मुटे यांचे अभिनंदन केले. तसेच सर्व कार्यकर्त्यांनी हे संकेतस्थळ चालविण्यासाठी मदत करावी, असे आवाहनही केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ संपादक सुरेश व्दादशीवार यांनी शरीराने थकलेल्या पण विचाराने अजूनही तरुण असलेल्या शेतकरी नेत्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी शेतकर्यांनी व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जबाबदारी स्वीकारावी असे सांगितले. तसेच या संकेतस्थळाने शेतकरी संघटना व तिचे कार्य हे सर्वदुर पसरणार असल्याने सध्या आलेली मरगळ झटकुन शेतकरी संघटनेने पुन्हा नव्याने उभारी घेण्याची गरज व्यक्त केली. शरीराने थकलेल्या पण मनाने आणि विचाराने तरूण असलेल्या नेत्याला आराम देऊन केवळ त्यांच्या मार्गावर कार्यकर्त्यांनी वाटचाल करावी असे सांगितले. येत्या ९ ऑगस्टला हजारोंच्या संख्येने शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी छातीवर संघटनेचा लाल बिल्ला लाऊन पुन्हा नव्या जोमाने शेतकर्यांच्या हक्काच्या लढाईसाठी मैदानात उतरणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवी देवांग यांनी दिली. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून मोठय़ा प्रमाणात शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित झाले होते. पटवर्धन यांच्या बासरी वादनातून 'वैष्णव जन तो तेने कहीए जे पीर परायी जाने रे' या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
*
लोकशाही वार्ता
लोकपाल विधेयकांने काय साध्य होणार?
जिल्हा प्रतिनिधी/ २२ जुलै
वर्धा : पं. नेहरु प्रणित समाजवादाच्या नावाखाली या देशामध्ये परमीट राज्य आणले.यातूनच मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळल्याने सर्वसामान्य माणूस हैराण झाला आहे. याला आळा घालण्यासाठी कायदा करणे महत्वाचे नाही. इतकेच नव्हे तर सध्या गाजत असलेल्या लोकपाल विधेकातूनही हा भ्रष्टाचार संपुष्टात येणार नाही. मग असे विधेयक तयार करून काय साध्य होणार असा सवाल शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी उपस्थित केला. आज वर्धा शहरातील गुजराती भवनात शेतकरी संघटनेच्या वेबसाईटचे उद््घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी उद्घाटक म्हणून दिल्ली येथील जेष्ठ पत्रकार वेदप्रताप वेदीक, अध्यक्षस्थानी प्रा. सुरेश द्वादशीवार तर प्रमुख पाहूणे म्हणून अँड. वामनराव चटप, माजी आमदार सरोज काशीकर, शैलेजा देशपांडे, मधुसुधन हरणे, अँड. दिनेश शर्मा, रवी देवांग, अंजना पातुकर व अन्य मान्यवर उपस्थितीत होते. शरद जोशी पुढे म्हणाले, गोखले, न्या. रानडे, टिळक यांच्या काळातील आदर्श आता अस्ताला जात आहे. नेहरुवादी समाजवादाने भ्रष्टाचाराला जन्म दिला. त्याला कायमचा निपटून काढायचा असेल तर राजकीय व्यवस्थेत आमुलाग्र परिवर्तनाची गरज आहे.
शेतकरी संघटनेने शेतकर्यांचे प्रश्न अतिशय गांभिर्याने राज्यकर्त्यांकडे मांडले. हा संपूर्ण इतिहास वेबसाईटच्या माध्यमातून आता जगापर्यंत पोहचणार आहे. ही वेबसाईट शेतकरी संघटनेचे वर्धा जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे यांनी तयार केली. यामध्ये संघटनेच्या निर्मितीपासूनचा इतिहास व महत्वपूर्ण माहिती उपलब्ध आहे. जेष्ठ पत्रकार वेदीक म्हणाले, राज्यसत्तेने यथा स्थितीवादाला आधार बनवू नये. जनआंदोलनामुळे संपूर्ण जगात राजकीय सत्तेत बदल होत आहे. या आंदोलनांना समाज परिवर्तनाचे आधार असले पाहिजे. राज्यकर्त्यांवर नियंत्रण ठेवण्याची व्यवस्था आपण अजूनही तयार करू शक लो नाही याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. नवे तंत्रज्ञान शेतीला मारक ठरवू नये असेही ते म्हणाले. प्रा. द्वादशीवार यांनी शरद जोशी यांच्या कार्याचा आढावा घेवून ही संघटना बळकट करण्यासाठी नव्या भूमिका जोशी यांच्या नेतृत्वात अजूनही कायम असल्याचे आवर्जुन नमुद केले. यावेळी गंगाधर मुटे यांनी लिहिलेल्या 'वांगे अमर रहे' या पुस्तकाचे प्रकाशन देखील करण्यात आले आहे.
*
शपथ
मी शपथ घेतो की,
शेतकर्यांचे लाचारीचे जिणे संपवून
त्यांना देशातील
इतर नागरीकाप्रमाणे
सन्मानाने व सुखाने जगता यावे
याकरिता ’शेतीमालाला रास्त भाव’
या एक कलमी कार्यक्रमासाठी
संघटनेचा पाईक म्हणून
मी सर्व शक्तीने प्रयत्न करेन.
या प्रयत्नात
पक्ष, धर्म, जात वा
इतर कोणत्याही भेदाभेदांचा
अडथळा येऊ देणार नाही.
* * *
मा. शरद जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
शेतकरी संघटनेचे प्रणेते
मुंबईतील 'चतुरंग प्रतिष्ठान' संस्थेचा या वर्षीचा सामाजिक क्षेत्रासाठी असलेला 'जीवनगौरव' पुरस्कार शेतकरी संघटनेचे नेते श्री. शरद जोशी यांना प्रदान करण्यात आला. भारतासारख्या शेतीप्रधान देशात, सर्वदूर पसरलेल्या शेतकर्यांची मोठी संघटना बांधण्याचा आणि त्यांच्या शेतीविषयक बहुविध प्रश्नांची तड लावण्यासाठी कृतिशील चळवळ उभारण्याचा जो ध्यास श्री. शरद जोशी यांनी आयुष्यभर धरला, त्यासाठी अथक प्रयत्न केले, शेतीमालाला वाजवी भाव मिळावा, शेतकर्यांच्या न्याय्य मागण्या मान्य व्हाव्यात, त्यांच्या प्रश्नांचा साकल्याने विचार साहित्य प्रस्तृत करून समाजमनात शेतकरी बांधवाविषयी जागृती निर्माण व्हावी, तसेच ग्रामीण महिलांही संघटित होऊन कार्यरत व्हाव्यात अशा बीजस्वरुपी समाजकार्याचा विचार करून कृतिशील चळवळ उभारणार्या त्यांच्या जीवनध्येयाचा आणि त्यासाठी त्यांनी केलेल्या अथक परिश्रमी कार्याचा आम समाजातर्फे सामाजिक जाणीवेतून कृतज्ञतापूर्वक गौरव व्हावा, या भावनेने चतुरंग प्रतिष्ठानने यंदाचा सामाजिक 'जीवनगौरव' पुरस्कार श्री. शरद जोशी यांना मुलुंड, मुंबई येथील कालिदास नाट्यगृहात १८ डिसेंबर २०१२ रोजी संपन्न झालेल्या भव्य संमेलनात प्रदान करण्यात आला. उपस्थितांनी सुमारे पाच मिनिट उभे राहून प्रचंड टाळ्यांचा गगनभेदी कडकडाट करून मा. शरद जोशींना मानवंदना दिली.
यावेळी शरद जोशी यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतांना श्री अनंत दीक्षित म्हणाले की, आजची ही संध्याकाळ देशाच्या दृष्टीने मौलिक अशी आहे. "एकच दिसतो समोर तारा, परी पायतळी अंगार’’ असे कवी कुसुमाग्रजांनी म्हटलेय, आज शरद जोशींना दिला जाणारा चतुरंग पुरस्कार लोकांमधून आलेला असल्याने हा पुरस्कार मोठा आहे, या पुरस्काराला औचित्य आहे; तरी देखील शरद जोशींचा देशपातळीवर मोठा गौरव होण्याची आवश्यकता होती, असे मला वाटते. अर्थात गौरव, पुरस्कार, समारंभ व मान्यता याच्या पलीकडे ते गेलेले आहेत.
इंडिया विरुद्ध भारत या संकल्पनेने पेटंट शरद जोशींनी घ्यावे, अशा तर्हेची मूलभूत संकल्पना त्यांनी समाजाला दिली. एकीकडे बदलणारा भारत दिसतो, एकीकडे न बदलणारा भारत दिसतो; एकीकडे इंडियात अनूवीज ऊर्जा प्रकल्प निर्माण करण्याची भारताची ताकद किती आहे, हे सांगितले जाते तर दुसरीकडे भारतात गाव हागणदारी मुक्त करण्यार्या योजनांची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू असते. हा जो भारत आहे, त्या भारताचे दुखणे आणि नासणे कशात आहे, हे सांगणे फार अवघड आहे. अशा या आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये गौरवशाली व प्रभावशाली कार्य शरद जोशी यांनी केले आहे. समाज पुढे यावा यासाठी प्रसंगी अपयशांना देखील सामोरे जाऊन आयुष्यभर काम करणे जिकिरीचे जरी असले तरी शरद जोशींनी यशस्वीपणे निभावले आहे.
तीस वर्षापूर्वी निपाणीला जेव्हा तंबाखूचे आंदोलन झाले, तेव्हा मला जोशींच्या कार्याविषयी पहिल्यांदा जवळून ओळख झाली. जन्म कुणाच्या पोटी घ्यावा, हे कुणाच्या हातात नसते. पण आधुनिक महाराष्ट्राच्या निर्मितीच्या इतिहासामध्ये शरद जोशींचा जन्म कोणत्या जातीत झालेला आहे, हा प्रश्न बहुजन समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरलेला नाही. या अनुषंगाने महाराष्ट्राच्या इतिहासाचा विचार केला तर ज्यांच्या बाबतीत जन्म कोणत्या जातीत झालेला आहे, हा प्रश्न बहुजन समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरलेला नाही, असे पहिले नाव म्हणजे श्री दांडेकर, दुसरे श्रीपाद डांगे, तिसरे आचार्य प्र.के. अत्रे आणि चौथे नाव म्हणजे शरद जोशी. शरद जोशींचे अनेक भाषांवर प्रभुत्व आहे. जितक्या सहजतेने ते शेतकरी समाजाशी मराठीमध्ये संवाद साधतात तितक्याच सहजतेने त्यांनी फ्रेंच भाषेमध्ये विदेशात भाषणे केलेली आहेत. त्यांना संस्कृतचे व्यासंगी प्राध्यापक व्हायचे होते. खरे तर शरद जोशी हे अलौकिक व्यक्तिमत्त्व आहे. हा मनुष्य शब्दाने, वर्णनाने किंवा वाचनाने समजेलच असेही नाही. हे व्यक्तिमत्त्व कुठल्यातरी साच्यात बसवता येणे कठीण आहे. सगळ्याच गोष्टी आयुष्यात शब्दांना झेपतातच असे नाही, त्याला कृतिशीलतेची सांगड असावी लागते. महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आणि चंदिगढ पासून उत्तरप्रदेशापर्यंत विविध शेतकरी आंदोलनांचे नेतृत्व करणे हे काम वाटते तेवढे सोपे नाही. अर्थशास्त्र आणि संख्याशास्त्राचा उपयोग करून या शेतकरी योद्ध्याने अनेक चमत्कारिक गोष्टी लीलया साध्य केलेल्या आहेत. मोठमोठ्या अर्थशास्त्र्यांना समजायला कठीण जाईल असे अर्थशास्त्र शेतकर्यांना अगदी सहजतेने समजावून सांगण्याचा चमत्कार शरद जोशींनी घडवून आणला आहे. वारकरी संप्रदायाच्या भाषेत सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की "सोप्यात सोपी गोष्ट कारण नसताना अवघड करून सांगतात त्यांना विद्वान असे म्हणतात" आणि "अवघडातील अवघड गोष्ट जे सोपी करून सांगतात, त्यांना संत असे म्हणतात." हा संतत्वाचा प्रभाव शरद जोशींमध्ये आहे म्हणूनच त्यांना ऐकायला लाखोंनी महिला देखील स्वखर्चाने त्यांच्या भाषणाला गर्दी करतात. भाषिक दृष्ट्या अस्मिता हरवलेला आणि दुभंगलेला समाज, जात, धर्म, भाषा, प्रांत आणि प्राचीन धर्म-परंपरेच्या अस्मिता दर्शक गोष्टीपासून पूर्णपणे अलिप्त राहणारा पण रोजच पराभूत होणारा सामान्य माणूस जात-भाषा-धर्मवादी नाही, ही भूमिका जाहीरपणे घेऊन लोकसंगठन करण्याचे ऐतिहासिक कार्य शरद जोशी यांनी महाराष्ट्रात केलेले आहे.
कुठल्याही विषयावर मूलभूत आणि मूलगामी विचार करणे, हे आजच्या विचारप्रक्रियेच्या बाजारपेठेत अडचणीचे ठरत चाललेले असताना, लोकांना रुचेल तेच बोलायचे, अशी सर्वसाधारण पद्धत रूढ झालेली असल्यामुळे आपण आपली स्वतःची ओळख करून घेणेच विसरून गेलो होतो. अशा विपरीत स्थितीत शरद जोशींनी समाजाला स्वतःची ओळख करून घ्यायचे शिकविले, ही महाराष्ट्राच्या दृष्टीने फार मोलाची बाब आहे. शरद जोशी म्हणतात की, प्रत्येक अनन्यसाधारण व्यक्ती ज्याच्या त्याच्या प्रकृतीप्रमाणे आपले जाणीवांचे आणि अनुभवांचे जग व्यापक करण्याच्या धडपडीत असतो. आयुष्य विविधतेने संपन्न व्हावे, निवड करण्याची संधी क्षणाक्षणाला मिळावी आणि प्रत्येक निवडीच्या वेळी अनेक विकल्प उपलब्ध व्हावेत, याचा शोध घेण्यासाठी मनुष्यप्राणी धडपडत असतो आणि हा शोध स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावणारा असतो. शरद जोशी असेही म्हणतात की, सत्यापेक्षा स्वातंत्र्याचे मोल जास्त असते. इतिहासाकडे बघितले तर असे दिसून येते की, समाजाला स्वतःचे योग्य स्थान मिळवून देण्याच्या महात्मा फुले, राजर्षी शाहू आणि डॉ. आंबेडकर यांनी सुरू केलेल्या लढाईच्या रणांगणातील शरद जोशी हे श्रेष्ठ लढवय्ये आहेत.
सत्काराला उत्तर देताना शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी म्हणाले की, आज मला बरेच दिवसानंतर काठीचा आधार न घेता स्वतःच्या पायावर उभा राहून बोलताना पाहून माझ्या सर्व शेतकरी सहकार्यांना आनंद वाटत असेल. अलीकडे मला उठून उभेही राहता येत नाही, खुर्चीवर बसून बोलत असतो पण आज मी सर्वांना सांगतो की, जोपर्यंत हिंदुस्थानातील सगळे शेतकरी संपूर्णतः: कर्जमुक्त होत नाहीत तोपर्यंत मी डोळे कदापि मिटणार नाही.
माझ्या संबंध सामाजिक कार्याची सुरुवात मी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये जेव्हा "सेकंड डेव्हलपमेंट डिकेड" म्हणजे त्यांच्याकडे पंचवार्षिक योजनांऐवजी दहा वर्षाच्या योजना असतात, त्या समितीचा मी सदस्य होतो, तेथूनच झाली. त्या समितीच्या सदस्याच्या भूमिकेतून मी वेगवेगळ्या विशेषकरून लॅटीन अमेरिका आणि आफ्रिकेतील अनेक देशांचा दौरा केला तेव्हा हिंदुस्थानातील शेतकरी निरक्षर, आळशी आणि व्यसनी आहे शिवाय लग्नप्रसंगी वगैरे अनावश्यक प्रचंड खर्च करतो म्हणून हिंदुस्थानातील शेतकरी गरीब आणि कर्जबाजारी आहे असे हिंदुस्थानासहित युरोपातील शेती संबंधातील सर्व पुस्तके सांगत होती. सर्व अर्थशास्त्र्यांमध्ये अशा तर्हेच्या कुभांड रचणार्या विचारांना मान्यता होती. अशा कुभांडी विचारांना खोडून काढण्याचे ऐतिहासिक कार्य माझ्या हातून घडले, हे विनम्रतेने मी मान्य करतो.
शेतकरी संघटनेच्या प्रारंभीच्या काळात मी पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमध्ये जात असे आणि नेहरूंच्या समाजवादी धोरणांमुळे हे सर्व संकट भारतावर कोसळले आहे असे सांगत असे. शेतीचे शोषण केल्याखेरीज समाजवादी उद्योगधंद्याचे पोषण होणार नाही अशी समाजवादी विचारसरणी बाळगून पंडित नेहरू असमतोलाच्या दिडदांडी तराजूच्या आधाराने औद्योगिक विकास साधण्यासाठी शेतीतील कच्च्या मालाचे शोषण करीत आहे, असे मी त्यावेळी सांगत असे आणि शेतीमालाला रास्त भाव हा एककलमी विकासाचा व गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम आहे, असे मी फार आग्रहाने मांडत असे.
जपानी लोकांमध्ये खूप देशभक्ती आहे म्हणून जपानी लोक श्रीमंती आणि वैभवाकडे गेलेले नाहीत तर १९२१ सालापासून जपानमध्ये तयार होणार्या भाताला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत असणार्या भावापेक्षा पाचपट अधिक भाव मिळत आहे. त्यामुळेच तेथील शेतकर्यांच्या हातात पैसे आले आणि त्यातूनच तेथील शेतकर्यांनी छोटेछोटे गृहउद्योग सुरू केलेत. नंतर त्या गृहउद्योगात तयार झालेल्या वस्तूंच्या जोडणीचे कारखाने सुरू झालेत आणि त्यातूनच त्या देशाचा औद्योगिक विकास झाला. आजही जपानमध्ये टोयाटोसारखे मोठमोठे कारखाने गावात पाहायला मिळतात. कारखानदारीच्या विकासाकरिता जपान्यांना कधी शहराकडे धाव घेण्याची गरज पडली नाही. शेतमालाला भाव मिळाला पाहिजे हे जपानमध्ये अगदी १९२१ सालापासूनच मान्य करण्यात आले. नंतर चीननेही अशाच तर्हेच्या धोरणांचा अंगिकार केला; मात्र पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानात शेतीचे मरण ठरेल अशाच तर्हेचे धोरण आखल्या गेले. शेतीमालाला रास्त भाव मिळताच कामा नये, अशा तर्हेचे अधिकृत धोरण पंडित नेहरूंनी राबविले. दुसर्या पंचवार्षिक योजनेच्या दस्तावेजात आजही याचे अधिकृत पुरावे उपलब्ध आहेत.
अशा तर्हेचे धोरण राबविल्या गेल्यामुळेच शेतमालाला रास्त भाव मिळाला नाही आणि शेतकरी कर्जात बुडाला. आज देशात शेतकरी आत्महत्या होत आहे त्यात कापूस उत्पादक शेतकर्यांची संख्या फार मोठी आहे. शेतकरी आत्महत्यांची संख्या कापूस उत्पादक क्षेत्रात जास्त आहे कारण शेतमालाचा विचार करता सगळ्यात जास्त लूट कापूस या पिकाची झाली आहे. जर का आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे भाव २१० रुपये असतील तर हिंदुस्थानात कापसाला कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया १०० रुपयापेक्षा जास्त भाव दिले नाही. महाराष्ट्रामध्ये गेली अनेक वर्षे कापूस एकाधिकार योजनेखालीच कापसाची खरेदी होत असल्याने विदर्भातील शेतकर्यांना ६० रुपयाच्या वर कधीच भाव मिळाले नाहीत. जगाच्या बाजारपेठेत २१० रु. भाव असताना विदर्भात कापसाला केवळ ६० रुपयेच मिळाल्याने विदर्भातील शेतकर्यांवर आत्महत्येचे संकट ओढवले आहे. आतापर्यंत एक लक्ष साठ हजार शेतकर्यांनी आत्महत्या केल्यात. याला वंशविच्छेद असा शब्द वापरता येईल. असा वंशविच्छेद होऊनही अजूनपर्यंत शहरातील कोणत्याही माणसात याविषयी थोडीसुद्धा कणव निर्माण झाली नाही. याविषयी आपले काहीतरी चुकत असावे, आपण विचार करायला हवा.
गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि त्यासाठी ग्रामीण महिलांना काही किलोमीटर अंतरावरून डोक्यावर घागर घेऊन पाणी आणावे लागते, हा प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही गावाच्या मध्यभागी एक हौद बांधावा आणि त्यात मोटर पंपाच्या साहाय्याने पाणी आणून सोडावे, जेणेकरून महिलांचे जगणे सुसह्य होईल, असा विचार करून कामाला लागलो तेव्हा त्याच गावातील एक म्हातारी आजीबाई येऊन माझ्या बायकोला म्हणाली की, बाई तुम्ही सर्व करा पण पाण्यासाठी गावात हौद बांधू नका कारण सध्या सासुरवाशीण मुलींना आपसातले दु:ख एकमेकींजवळ व्यक्त करायला निदान पाणवठा ही एकतरी जागा उपलब्ध आहे. तुम्ही जर हौद बांधला तर त्यांची आपसातील दु:ख व्यक्त करण्याची एकमेव जागाही कायमची बंद होईल.
मी शेतीमालाला उत्पादनखर्चावर आधारित भाव मिळायला हवे, अशी मांडणी केली तेव्हा सुरुवातीला खूप वादविवाद झालेत. उत्पादन खर्च कुणी व कसा काढायचा याविषयीही उहापोह झाला तेव्हा शेतीमध्ये जे उर्वरक, बियाणे, कीटनाशके लागतात त्याचा एक इंडेक्स तयार करावा असे काहींनी मांडले. मला मात्र शेतीमालाचा उत्पादनखर्च सरकारी यंत्रणांनी काढावा, हे अजिबात पटत नाही कारण शेतमालाला रास्त भाव न मिळण्यात सरकार हाच सर्वात मोठा अडसर आहे. सरकार समस्या क्या सुलझाये, सरकार यही समस्या है।
कोणत्याही बाजारपेठेमध्ये जर पूर्णपणे खुली व्यवस्था असेल आणि त्यात अनावश्यक सरकारी लुडबुड नसेल, केव्हाही शेतमालाची निर्यातबंदी करायची, वाटेल तेव्हा आयात करून शेतमालाचे भाव पाडायचे, अशा तर्हेचे उपद्व्याप जर सरकारने केले नाहीत आणि त्याच बरोबर शेतमालाच्या प्रक्रियेवरती, वाहतुकीवरती जर सरकारने बंधने लादली नाहीत तर या व्यवस्थेत मिळणारी किंमत शेतकर्यांना मान्य होण्यासारखीच असेल याची मला खात्री आहे.
डॉ. अरुण टीकेकर यांचे अध्यक्षतेखालील डॉ. द.ना.धनागरे, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. विनय सहस्रबुद्धे, श्री. अविनाश धर्माधिकारी, श्री. सुधीर जोगळेकर आणि सौ. प्रफ़ुल्ला डहाणूकर या मंडळींनी यंदाच्या २१ व्या जीवनगौरव पुरस्काराच्या निवड समितीचे कामकाज पाहिले. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि एक लक्ष रुपये असे पुरस्कार स्वरूप असलेला हा जीवनगौरव पुरस्कार यापूर्वी सामाजिक क्षेत्रासाठी श्रीमती इंदिराबाई तथा मावशी हळंबे (१९९२), डॉ. इंदुमती गोवर्धन पारिख (१९९५), श्रीमान पांडुरंगशास्त्री आठवले (१९९९) आणि श्रीमान नानाजी देशमुख (२००३) आणि सौ. साधनाताई आमटे (२००७) या मान्यवरांना देण्यात आला होता.
'जीवन गौरव' पुरस्कार प्रदान सोहळ्याला डॉ. अरुण टिकेकर, श्री अनंत दीक्षित, डॉ. द.ना. धनगरे, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. विनय सहस्रबुद्धे, श्री सुधीर जोगळेकर, श्री अविनाश धर्माधिकारी, सौ. प्रफ़ुल्ला डहाणूकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नरेंद्र बेडेकर यांनी तर मानपत्र वाचन श्री तुषार दळवी यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सुधीर जोगळेकर, गौरवपर भाषण श्री अनंत दीक्षित, अध्यक्षीय भाषण डॉ. अरुण टिकेकर तर समारोपीय आभार प्रदर्शन श्री विद्याधर नेमकर यांनी केले.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(छायाचित्र श्री अरुण दातार यांच्या सौजन्याने)
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट - शरद जोशी
महामेळाव्याला संबोधित करतांना मा. शरद जोशी
या मंचावर उपस्थित असलेले आंध्रप्रदेश,हरयाना,कर्नाटक या राज्यांचे शेतकरी प्रतिनिधी आणि महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून आलेल्या महिला शेतकरी भावांनो आणि मायबहिनींनो, मी तुम्हाला पहिल्यांदा प्रणाम अशासाठी करतो की गेली सहा वर्षे मी राज्यसभेचा खासदार असल्यामुळे शेतकरी संघटनेचं हे सगळं वैभव पाहण्याची संधी मला मिळाली नव्हती. फ़ार फ़ार वर्षांनी पुन्हा एकदा सबंध मैदान गच्च भरलेली शेतकर्यांची सभा पुन्हा माझ्या डोळ्यांनी पाहिली आणि माझे डोळे तृप्त झाले. गेल्या ८-१० दिवसातली बातमी आहे, वर्ध्यासारख्या ठिकाणी गांधीचं नाव घेऊन सोनिया गांधी स्वत: येत असताना कोट्यावधी रुपये जमा झाल्याखेरीज १०-२० हजाराची सभा कॉंग्रेसला जमा करता येत नाही. आणि येथे केवळ वर्तमानपत्रामध्ये निरोप देऊन लाखाच्या वरची सभा येथं जमते, तुम्हाला सगळ्यांना मी शतश: प्रणाम करतो.
मघापासून मी बघतो आहे, कधी इकडचा एखादा मनुष्य,कधी तिकडचा, कधी दोनचार इकडचे तिकडचे उठून मागे वळून पाहताहेत. जशी एखादी अत्यंत रुपवती सुंदर मुलीला आपण खरंच किती सुंदर आहो, त्याचा अंदाज घेण्याकरिता आरशाच्या समोर उभे राहून मागे वळून वळून पाहावंसं वाटतं, तसंच शेतकरी उभे राहून वळून मागे पाहात आहेत की, आपली गर्दी केवढी आहे. तुमचे सगळ्यांचे मी शतश: आभार मानतो. आणि त्याच्या बरोबर मी तुमची क्षमा मागतो. क्षमा अशाकरिता मागतो की, तुमच्या सगळ्यांच्या समोर मी प्रतिज्ञा केली होती की, जोपर्यंत हिंदुस्थानातला सगळा शेतकरी संपूर्णत: कर्जमुक्त होत नाही – त्यात छोटा नाही,मोठा नाही,उसाचा नाही,कापसाचा नाही,सगळा शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त होत नाही- तोपर्यंत कोणत्याही तर्हेचा सत्कार, कोणत्याही तर्हेचा हार, कोणत्याही तर्हेचा सन्मान मी स्विकारणार नाही, अशी मी तुमच्यासमोर शपथ घेतली होती. तुम्ही गेले दोन तास येथे बघताहात, इथे काय काय कार्यक्रम झाला आणि तुम्ही मनामध्ये प्रश्न विचारला असाल की शरद जोशींनी सत्कार घेणार नाही अशी शपथ घेतली होती, आणि इथे तर सत्कारच सत्कार चालू आहे. खरं आहे काय?
प्रतापसिंह यांनी शपथ घेतली होती की, जोपर्य़ंत चित्तोडचा किल्ला माझ्या हाती पुन्हा येत नाही तोपर्य़त मी गादीवर झोपणार नाही. प्रतापसिंह निघून गेले आणि मग त्यांच्या वंशज़ांनी नावापुरत्या गादीच्या खाली २-४ गवताच्या काड्या टाकून झोपायला सुरुवात केली, तसं काही शेतकरी संघटनेच्या बाबतीत होते की काय, अशी तुमच्या मनात शंका आली असेल. म्हणून भाषणाच्यापुर्वी मी तुम्हाला स्पष्ट करतो की, शेतीमालाला भाव मिळवून देणे आणि शेतीमालाला भाव मिळू नये याच्याकरिता जागतिक पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर जी जी काही अडथळे, जी जी काही बंधने घातली जातात, ती,त्या बंधनांचा प्राणपणाने विरोध करण्याची शपथ, मी संघटनेत घेतलेली प्रतिज्ञा आजही जशीच्या तशी शाबूत आहे. आणि तितक्याच वेगाने आता मी अमंलात आणणार आहे.
विचित्र गोष्ट अशी आहे की, इथे बोलतांना अनेकांनी सांगीतलं की महाराष्ट्राच्या शेतकर्यांसमोर फ़ार गंभीर प्रश्न उभे आहेत. तुमची वीज तोडून टाकणार असं उर्मटपणे मंत्री बोलतात आणि त्याच्याबरोबर दुसरा एक मंत्री दिल्लीहून सांगतो की आता तुमच्या डिझेलचा भाव दुप्पट तिप्पट होणार आहे. सगळ्या महाराष्ट्रामध्ये शेतमजुरीचा दर जेव्हा शेतकरी संघटना चालू झाली होती तेंव्हा ३ रुपये होता. आज १५० रुपये रोजाच्या खाली कुठेही मजूर मिळत नाही. सगळ्या शेतमजुराची ही जी काही उन्नती झाली आहे,त्याचं श्रेय्य एकट्या शेतकरी संघटनेकडे आहे, हे मी तुम्हाला सांगतो.पण वीज नाही, औषध खत नाही, खत घ्यायला गेलं तरी ते सुद्धा विकत मिळत नाही. मजुरीचा दर १५० रुपयाच्यावर, शेती कशी करायची? हा मोठा गंभीर प्रश्न सगळ्या शेतकर्यांसमोर आहे. निर्यातीच्या बंधनामुळे कापसाच्या भावाचा एक वेगळा प्रश्न आहे, उसाच्या भावाचा एक वेगळा प्रश्न आहे, आणि हे सगळं असतांना सभेच्या दोन–अडीच तासापैकी दिड तास केवळ सत्कारावरती वापरला गेला, याच्या बद्दल मी तुमची सगळ्यांच्या वतीने क्षमा मागतो. माझ्या सहकार्यांनी सत्काराचा एवढा घाट घातला, त्याची भावनाही थोडी मी समजून घेतो,थोडी तुम्ही समजून घ्या. यांनी माझ्याबरोबर गेली २५ वर्ष काम केलं आहे, माझ्याबरोबर ते तुरुंगात गेले आहे, घरादाराचा कधीही विचार केला नाही, शरद जोशींनी हाक दिली की घर सोडून ते पिसाटासारखे बाहेर आले आहेत. त्यांच्या माझ्याविषयी काही व्यक्तिगत भावना आहेत, आणि मी त्यांना कितीही सांगीतलं, कोणत्याही प्रकारचा सत्कार करू नये, तरी त्यांची अशी बुद्धी होते की, आपल्या भावनेला कुठेतरी वाचा फ़ुटली पाहीजे, म्हणून त्यांच्या हस्ते ही आगळीक घडली, त्यांना आपण क्षमा करावी, मी त्यांना क्षमा केली आहे.
हिंदुस्थानतल्या सगळ्या शेतकर्यांसमोर वेगळे-वेगळे प्रश्न आहेत. महाराष्ट्रातल्या शेतकर्यांचे जे प्रश्न सांगीतले त्या प्रश्नामध्ये वीज तोडण्याचा प्रश्न, धानाचा भावाचा प्रश्न, कपाशीच्या भावाचा प्रश्न व उसाच्या भावाचे प्रश्न सांगीतले. आम्ही आताच किसान समन्वय समितीची भली मोठी एक दिवसभराची बैठक घेतली, तिच्या मध्ये आणखी काही वेगळे प्रश्न आले आणि अद्यापपर्यंत या सगळ्या सभेमध्ये कोणीही न मांडलेला मुद्दा मी तुमच्यासमोर मांडतो. कदाचित तुम्ही त्याच्याबद्दल वाचलं नसेल. जे शेतकरी संघटक वाचतात त्यांना त्याचा थोडाफ़ार अंदाज असेल. पण काही वर्षापुर्वी, ४० ते ५० वर्षापुर्वी भारत सरकारने आणि राज्य सरकारने, सगळ्या शेतकर्यांच्या जमिनीवरती सिलींग लादण्याचा कायदा केला होता, ते तुम्हाला आठवत असेल, १८ एकर आणि ५४ एकर. आता केंद्र सरकार एक नवीन कायदा करित आहे आणि त्या कायद्यामध्ये आता १८ एकर नाही, ५४ एकर नाही, जास्तीत जास्त जमीनधारणा ही बागायती क्षेत्राकरीता २ एकराची आणि कोरडवाहू क्षेत्राकरीता फ़क्त ५ एकराची असणार आहे. हे दोन आकडे तुम्ही लिहून घ्या. मनाशी विचार करा की, ज्या लोकांनी तुम्हाला खर्या शेतकर्याचे नेते आपणच आहोत, म्हणून गावोगाव पोस्टर लावली, तेच लोक आता शेतकर्याला २ एकरापेक्षा जास्त एकर जमीनधारणा करता येऊ नये, अशा तर्हेचा कायदा आणणार आहे.
पंडीत जवाहर नेहरू जिवंत असताना एकदा त्यांनी असा प्रयत्न केला होता. आणि ज्या पक्षाचा वारसदार स्वतंत्र भारत पक्ष आहे, त्या स्वतंत्र पक्षाने आणि चक्रवर्ती राजगोपालाचारींनी नागपूर कॉंग्रेसमध्ये त्यांचा बेत हाणून पाडला होता. तुमच्या शेतीवरती जी संकटे येत आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं,सगळ्यात मोठं संकट कोणतं असेल तर पुन्हा एकदा दुसर्यांदा येणारा हा जमीन धारणाकायदा असणार आहे. हे लक्षात घ्या. तुम्हाला आज जी काही लढाई करायची असेल ती करा, धानाकरीता करा, उसाकरीता करा, कापसाकरीता करा, पण उद्या तुमची जमीनच राहिली नाहीतर तुम्ही शेतकरीच कसे राहणार? तेव्हा मुख्य जी तुमची ताकत लावायची आहे ती शेतकर्याच्या जमीनीचं राष्ट्रीयीकरण होऊ नये, शेतकर्याला जमीन ठेवण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, त्याची वासलात लावण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, त्याच्याकरीता आपल्याला लढाई द्यावी लागणार आहे आणि मी देखील आता इथे झालेली पुष्कळशी भाषणं ऐकली, तरूण मंडळींनी मोठ्या जोषात भाषणं केलीत, मी तुम्हाला सांगणार आहे की, शेतकरी संघटनेने कधीही त्वेषपूर्ण व जोषपूर्ण भाषणांवर विश्वास ठेवला नाही.
शेतीच्या परिस्थितीचा शांतपणे विचार करावा, हिशेब मांडावेत, आपलं काय चुकत आहे याचा हिशेब मांडावा, पिक काढण्याकरिता आपल्याला काय खर्च येतो आणि आपल्याला मिळतं काय? याचाही हिशेब मांडावा, आणि असा शांत डोक्याने हिशेब मांडून मग काय आंदोलन करावं त्याचं अर्थशास्त्र मांडावं, हा शेतकरी संघटनेनी गेली २५-३० वर्ष तुम्हाला दिलेला संदेश आहे. गेली २५-३० वर्ष सतत शेतकरी संघटनेनी केलेली भाकितं खरी ठरली. ते आता उस कारखाण्याविषयी बोलत आहे. पण उस कारखाने सगळी बुडणार आहेत, हे भाकित शेतकरी संघटनेने २५ वर्षापुर्वी केलं. कापूस एकाधिकार हा शेतकर्यांच्या शोषणाचं षडयंत्र आहे, हे कापूस एकाधिकार बंद झाला पाहिजे ही मागणी शेतकरी संघटनेने केली होती. मी काही जोतिषी नाही, मी काही भविष्यवेत्ता नाही आणि तरीही माझ्या तोंडून निघालेली ही भाकितं २५-२५ वर्षांनी का होईना,पण १०० टक्के खरी ठरतात. याचं कारण असं की आम्ही मनामध्ये कोणत्याही तर्हेचा राग द्वेष येऊ न देता, प्राप्त परिस्थितीचा शांतपणे विचार केला आणि शांतपणे विचार करून मार्ग काढला. आणि म्हणून जे राजस्थानातल्या प्रतापसिंहाना जमले नाही, जे हरयानातल्या जाटांना सुद्धा जमले नाही, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे महाराष्ट्रात करून दाखविले. कारण गनिमी काव्याची लढाई आणि शांत डोक्याची लढाई महत्वाची असते.
शेगाव महामेळाव्याला उपस्थित जनसमुदाय
मी तुम्हाला पहिल्यांदा एक सल्ला देणार आहे की सगळी भाषणे झाली, कृतीमध्ये आपण कोठे कमी पडणार नाही, पण कृती करताना आणि जहाल कृती करताना सुद्धा डोक्याची शांती कधीही घालवू नका, आपल्याला आंदोलन करताना महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची ती ही की, सरकार म्हणतं की सगळ्यांना खायला मिळालं पाहिजे, अन्नधान्य अधिक पिकवा, पण त्याच्यामध्ये एक मंत्री बेमुर्वतखोरपणे म्हणतो की, आम्ही तुमची वीज कापणार आहो, आणि वीज कापण्याकरीता तुमच्या गावात सुद्धा कोणी मनुष्य येणार नाही. का? आमच्या वीज कंपनीचा कोणी मनुष्य गावातली वीज कापायला आला तर तुमच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या त्याच्या विजेच्या खांबावरती तो चढला म्हणजे त्याच्या खालती त्या आग लावून देतात. म्हणून तुमच्या गावात आम्ही कोणाला पाठवणार नाही. आम्ही काय करणार? तालूक्याच्या गावी किंवा त्याच्या पलिकडे जिथे आमचा ट्रांन्सफ़ार्मर आहे, ते आम्ही ट्रांन्सफ़ार्मर काढून नेणार, तुमच्या गावात यायला नको, तुमची वीज आम्ही तोडतो. याला वाटतं आपण खूपचं शहाणपण आणि युक्ती वापरली. आपण गनिमीकावा केला पण या गनिमीकाव्यापेक्षा सरस गनिमीकावा शेतकरी संघटनेकडे आहे. तू वीज कोणती कापणार? जी वीज तुझ्या साठ्यात राहील तीच ना? पण त्या साठ्यातली वीज येते कुठून? ती वीज येते आमच्या विदर्भातून. मघाशी जी जी भाषणं झाली वामनरावांनी भाषण केलं, रवि देवांगनी भाषण केलं. मी त्यांना सांगतो, तुम्हाला माझं वय ७५ झालं काय, १०० झालं काय, याचं काहीच देणंघेणं नाही. परंतू जर का तुमची वीज कापण्याकरीता तालुक्याच्या पातळीवरून ट्रांन्सफ़ार्मर हलवणारा तो शेतकर्याचा मुलगा आहे की नाही, मला शंका आहे. जर का कोणी असं करायला लागला तर ज्या मिळेल त्या मार्गाने विदर्भातली वीज महाराष्ट्रात जाणार नाही, याची जमेल त्या मार्गाने काळजी घ्या. कोणताही मार्ग वापरा. पण एवढ्याने लढाई संपणार नाही. तुम्ही धान्य वाढवावं, पिक वाढवावं, असं सरकारला वाटतं. पण तुम्हाला वीज मात्र मिळणार नाही, डिझेल मिळणार नाही, खतं मिळणार नाही, औषध मिळणार नाही, अशा तर्हेने सगळ्या शेतकर्यांना कोंडीत घालण्याचा प्रयत्न चाललाय. वीज नाही, औषध नाही, खतं नाही, बियाणही मिळणं कठीण आहे. एवढंच नव्हे तर तुमची जमीन सुद्धा फ़क्त २ एकर तुमच्याकडे राहील. मघाशी एक मुद्दा मी सांगायचा विसरलो, तो पुन्हा सांगतो, त्या कायद्यामध्ये तरतुद आहे की आता आम्ही हे जे नवीन नियम ठरवले. २ एकराचा आणि ५ एकराचा. ४० वर्षापुर्वी १८ एकर आणि ५४ एकर ठरलं. पण या कायद्याचा अमंल आता आम्ही ४० वर्षापुर्वीपासून घेणार आहोत. म्हणजे ४० वर्षापुर्वी तुमची जमीन किती होती? त्यावेळी जर का तुमच्याकडे जमीन जर समजा १०० एकर असेल, त्याच्यातली तुमच्याकडे १८ एकर राहीली. ८२ एकर त्यांनी काढून घेतली. आता तुमच्याकडे जी जमीन उरली त्याचा हिशेब लक्षात घेता, तुमच्याकडे फ़क्त २ एकर ठेवून ९८ एकर जमीन तुमच्याकडून काढून घ्यायची आहे. आणि याचा अर्थ असा की तुमच्याकडे आता जर जमीन राहीली नसेल, ही जी १८ एकर होती त्यापैकी सुद्धा काही जमीन तुम्ही काही विकून टाकली असेल तर काय करायचं? जुन्या काळी लेव्हीची व्यवस्था होती आणि तुमच्याकडनं ज्वारीची पोती घेऊन जायला सरकारी अधिकारी यायचे आणि तुमच्या घरी जर का लेव्ही घालायला ज्वारी नसली तर तुम्ही बाजारातून ज्वारी महागात विकत आणायची आणि ती स्वस्त भावात लेव्ही घालायची. हा मुर्खपणा तुम्ही केलाय ना? सरकारचं म्हणणं आहे की आता तुम्ही तेच करा. तुमच्याकडनं आम्ही जमीन काढून घेणार आहोत तेंव्हा त्याच्याकरिता पाहिजे तर बाजारातून नवीन जमीन विकत घ्या आणि आम्हाला द्या. ही केवढी भयानक गोष्ट आहे? याचा फ़क्त तुम्ही विचार करा. या परिस्थितीमध्ये आपल्याला डोकं शांत ठेवून शेती करायची आहे आणि मी तुम्हाला अशी विनंती करतो की, ह्या करीता काही शिस्त शिकावी लागेल. ही कल्पना मी काही पहिल्यांदा मांडतो आहे असे नाही. परभणीच्या अधिवेशनात मी मांडली होती. आम्ही वाटेल तितकं पिकवू. आणि त्या सगळ्या पिकाला आम्ही मागू तो भाव मिळाला पाहिजे, हे जगामध्ये शक्य नाही. कोणत्याही बाजारपेठे मध्ये हे शक्य नाही. ज्याला आपल्या पिकाचा भाव मिळवायचा आहे त्याला पिकाचं नियंत्रण करायला पाहिजे. तुमच्या घरची पोरं जशी हुशार व्हावी तर कुटूंबनियोजन केलं पाहिजे. तसं पीक नियोजन केल्याशिवाय तुम्हाला आता गत्यंतर नाही. कुटूंबनियोजनासारखं “हम दो, हमारे दो” सारखं आता आपल्याला पीक नियोजन करावं लागेल. आणि सोपी गोष्ट. मी जेंव्हा शेतकरी संघटनेचं काम चालू केलं तेंव्हा मला आठवतं की आमच्या एक कार्यकर्त्या शैलाताई देशपांडे, माहेरघर शहरातलं, लग्न झालं शेतकर्याच्या घरी. आणि त्या म्हणाल्या की पहिल्यांदा मला असं आश्चर्य वाटलं की, शेतकर्याच्या घरी खूप धान्य असतं पण शेतकर्याच्या घरी मात्र खातांना मातेरं धान्य घरी खायचं आण चांगलं धान्य असेल ते विकायचं. हे शेतकर्याच्या घरी का असते, हे मला कळेना. हे मला अनेकवेळा सांगितलं. आजपर्यंत आपण शेतकर्याने घरच्या लोकांना मातेरं खाऊ घातलं आणि चांगलं-चांगलं निवडक धान्य, चांगला-चांगला निवडक भाजीपाला, चांगलं-चांगलं दूध बाहेर विकलं. मी तुम्हाला सल्ला देणार आहे. तो सल्ला असा की, याच्यापुढे पहिल्यांदा कमी पिकवा, कमी पिकविण्याचा एक सोपा मार्ग आहे. बाजारामध्ये जाणे बंद करा. बाजारामध्ये खतबीत विकत घ्यायला जाऊ नका. आणि तुमचा मालही विकायलाही जाऊ नका. तुमच्याघरचे दूध तुमच्या पोराबाळांना पाजा. चांगलं अन्नधान्य, सकस जैविक पद्धतीने पिकविलेलं अन्नधान्य आपल्या पोरांना खाऊ घाला. याच्यापुढे त्यांना मातेर्यावर वाढवू नका. आणि जर का तुमच्याकडे अजून बाकी आणखी काही पिकवावं वाटलं, की नुसती एवढी ज्वारी पिकवून आमचं भागणार नाही, तर चांगली ज्वारी फ़क्त तुमच्या कुटूंबापुरती पिकवा. आणि मग जी काही बेकार ज्वारी, रासायनिक खत वगैरे वापरून हायब्रिड ज्वारी पिकवाल ना? त्याच्यासाठी मी एक चांगली युक्ती सांगतो. ती सगळी ज्वारी सुद्धा देशातल्या लोकांना आपण खाया करिता द्यायची नाही. त्या ज्वारीची वासलात मी लावणार आहे. मी तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यातून नावं मागविणार आहे. ही सभा झाल्याबरोबर तुम्ही माझ्याकडे नावं पाठवायची आहे. आणि मी त्या विद्यार्थ्यांना,शेतकर्यांना तुमच्या ज्वारीपासून, तुमच्या मक्यापासून तुमच्या भातातून, औरंगाबादला अधिवेशनात आपण जो अभ्यास केला त्याप्रमाणे इथेनॉल किंवा बायोडिझेल, त्याची किंमत आज बाजारात ५५ रुपये लिटर आहे. ते तयार कसं तयार करायचं ही विद्या मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि जर का गचाळ माल तयार करायचा आणि तो लोकांना खायला द्यायचा नाही, या मालाचा आपण पेट्रोल-डिझेल करायचे आहे. आणि चांगल्यापैकी पैसे कमवायचे आहे. आणि चांगलं धान्य मग आपल्या घरी घरच्यांना खाऊ घालायचे आहे. मला एकदा बघायचंच आहे की अजित पवार आणि शरद पवाराचे बच्चे किती वर्ष तग धरतात ते मला एकदा बघायचे आहे. चांगलं पिकवा, सकस अन्नधान्य आपल्या मुलांबायकांना खाऊ घाला आणि बेकार अन्न आपल्याला हरितक्रांतीच्या नावाने हरितक्रांतीच्या नावाने शिकवलं ना? त्याची वासलात लावायची माझ्याकडे सोपी युक्ती आहे. त्याचा आपण पेट्रोल-डिझेल बनवू या आणि जास्त पैसे कमवू या. पण या हरामखोर सरकारला हे धान्य आपण कोणत्याही किंमतीत देणार नाही.
यापलिकडे आणखी काही महत्वाच्या गोष्टी मला आपल्याला इथे शेगावला सांगायच्या आहेत. गजानन महाराजांच्या या तिर्थ क्षेत्रामध्ये एक वैशिष्ट्य आहे. काहीतरी गजानन महाराजांच्या पुण्याईचा हा भाग आहे. अनेकवेळा लोक मला म्हणतात की हे गजानन महाराजांनी “गण गण गणात बोते” हे काय वाक्य म्हटलं हो? बोना याचा हिंदीत अर्थ म्हणजे पेरणे. “गण गण गणात बोते” याचा अर्थ असा आहे की सर्वांनी जाऊन लोकालोकांमध्ये आपला विचार पेरावा. तुम्ही हा “गण गण गणात बोते” हा मंत्र येथून घेऊन जा आणि तुमच्या सबंध जीवनामध्ये आणि शेतकर्यामध्ये काय क्रांती होते ते बघा. १९८० सालापासून आपण शेतकर्यांच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आणि ती मान्य झाली. १९९१ साली पी नरसिंहराव पंतप्रधान होते आणि सध्याचे पंतप्रधान मनमोहनसिंह तेंव्हाचे अर्थमंत्री होते. तेंव्हा खुल्या व्यवस्थेची घोषणा झाली होती. तेंव्हा आपण याच गजानन महाराजांच्या शेगावात, याच मैदानात जमलो होतो. आणि चतुरंग शेतीचा आदेश आपण दिला होता.
योगायोग आहे, की आज वीस वर्षांनी पुन्हा याच नगरीत आपण जमलो आहोत, मी त्या वेळेसारखा तरूण राहीलो नाही. ती सभा झाल्यानंतर चतुरंग शेतीचा कार्यक्रम आपण फ़ार जोमाने राबविला होता. आज मी एका वेगळया पायरीवर आलो. मी कधीही कोणत्याही आदोंलनामध्ये तुम्हाला अशी गोष्ट करायला सांगीतली नाही की जी मी करायला तयार नव्ह्तो. तुम्हाला कधीही मी जीव धोक्यात घालायला सांगीतले नाही,माझा जीव धोक्यात घातल्याखेरीज. कांद्याच आंदोलन असो, उसाचं आंदोलन असो, आमरण उपोषण करण्याचा धोका मी घेतला. रस्ता बंद करायचा झाला तर रस्त्यावरती किंवा रेल्वेवरती जाऊन बसायचं काम मी केलं. वीज तोडण्याच्या आदोंलनामध्ये S.R.P ची नजर चुकवित पटकन उडी मारून नाहीसे होणे, हे करण्याची शक्ती सुद्धा एकेकाळी माझ्यात होती. आज दुर्दैवाने ती नाही. शंभर वर्षे मी जगावं अशी इच्छा तुम्ही व्यक्त केली. तुमची इच्छा तुम्ही व्यक्त केली. तुमची खरी इच्छा असेल ना, तर शंभर वर्षे मी जगावं ही सोपी गोष्ट आहे.
मी या जिवंतपणी “देखता डोळा” हिंदुस्थानातला सगळा शेतकरी कर्जमुक्त झालेला पाहीन, अशी मी प्रतीज्ञा केली आहे. तुम्ही अशी लढाई करा की त्यामुळे मला “ह्या डोळा, देवा देखता” हिंदुस्थानातला शेतकरी कर्जमुक्त झालेला पाहू द्या. शंभर नाही, महात्मा गांधीच्या वर एकशे वीस वर्ष मी जगून दाखवतो. पण ही अट आहे की या म्हातार्याचं स्वप्न तुम्ही पुर्ण करा आणि त्याच्या मुळे मला प्रचंड चेतना मिळाणार आहे. त्यासाठी काय वाटेल ते करा. आता इथे कल्पना मांडली आमच्या युवा संघटनेच्या नेत्याने. निर्यातीची बंधने उठवण्याकरिता काय काय करावं लागेल, त्या करीता या शेगावच्या बैठकीत मी काय काय बदल केला? वीस वर्षा पुर्वीच्या शेतकरी मेळाव्यामध्ये मी चतुरंग शेतीचा कार्यक्रम दिला होता. माजघर शेती, निर्यात शेती, व्यापार शेती आणि सीता शेती, असा चतुरंग कार्यक्रम दिला होता. या चार आकडयाचं काहीतरी मह्त्व आहे. मी या बैठकीमध्ये चार सेनापती इथे नेमलेले आहेत. हे चारही सेनापती तरूण पिढीतील असल्यामुळे मला जे काही करणे शक्य नाही ते त्यांना करता येईल. यापुढे शेतकरी संघटना चालविण्याचे आणि त्याचे आंदोलन चालवण्याचे सर्वाधिकार मी चार लोकांकडे दिले आहेत. त्यांचे नाव मी इथे जाहीर करणार नाही, ते अशाकरिता की जर त्यांची नावे जाहीर केली तर त्यांना इथेच अटक करतील, घरी पोचायचे नाहीत. मला तसं करायचं नाही. हे युद्ध गनिमीकाव्याचे आहे. पण आता इथं अनिल धनवट, आमचे युवा नेते, त्यांनी एक शिफ़ारस केली की आज सुद्धा इथे वेळ नाही, वेळ थांबु शकत नाही, जीव घाबरा होत आहे, एकदा आमचे श्वास मोकळे होऊ द्या आणि जितक्या लवकर शक्य होईल तितकं असं काहीतरी करण्याचा आदेश द्या की ज्यामुळे शेतकरी संघटना ही जिवंत आहे किंवा मृत आहे अशी शंका असणार्यांच्या डोळ्यात अंजन पडेल आणि शेतकरी संघटनेची प्रचंड ताकत पुन्हा एकदा जगाला दिसेल. सर्वसाधारणपणे शेतकरी संघटनेने नवीन आदोंलनाचा आदेश दिला म्हणजे मी विचारतो की कोण यायला तयार आहे. कितीजन तुरुंगात यायला तयार आहे. मी यावेळी हा प्रश्न नाही विचारणार. मी तुम्हाला वेगळ्या तर्हेने मतदान करायला संगणार आहे. आपण लोकशाही मार्गाने जाणारे आहोत. रावेरीला जेव्हा महीला अधिवेशन झालं तेव्हा कपाशीचा प्रश्न अत्यंत बिकट झाला होता आणि कापूस खरेदी होत नव्हती तेव्हा आपण रावेरी अधिवेशन संपल्या संपल्या, सगळ्या अधिवेशनाची लाखोंची संख्या घेऊन रेल्वे लाईनवर आणि रस्त्यावरती बसलो होतो. तो इतीहास पुन्हा एकदा घडवण्याचं मी ठरवलं आहे. आणि अनिलच्या विनंतीप्रमाने या सगळ्या सभेला मी विनंती करतो की, ही सभा संपल्यानंतर या सगळ्या सभेतील बायकांनी,पुरुषांनी,मुलांनी जवळ जो रस्ता तुम्हाला दाखवला जाईल, शेगाव रेल्वे स्टेशनच्या जवळ जे फ़ाटक आहे तेथे जाऊन आपण सगळ्यांनी रेल्वे अडवायची आहे. सगळ्यात पहिल्यांदा महिला जातील आणि त्यांना शिस्तीत पहिल्यांदा पुढे जाऊ दिल्यानंतर मग पुरुषांनी तेथे जायचे आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला हा कार्यक्रम संपल्याचा आदेश होत नाही, तोपर्यंत तेथे अत्यंत शांतपणे, कोणत्याही तर्हेचा दंगाधोपा, नासधूस न करता, आपल्या नेहमीच्या शिस्तीने तुम्ही जर का हा कार्यक्रम राबवून दाखवला तर मी असे म्हणेन की मी तुमच्या समोर ज्या कल्पना मांडल्या, की वीज नाही, पेट्रोल नाही, श्रमशक्ती नाही या परिस्थितीमध्ये आपण पीक नियोजनाच्या हत्याराने लढणार आहोत. आणि आवश्यक पडलं तर त्याच्याकरिता आमची जुनी शमिच्या झाडावर ठेवलेली हत्यारे उपसायला सुद्धा आम्ही कमी करणार नाही. हे जर तुम्ही दाखवून दिलं तर मी असं समजेन, की तुमची खरोखर इच्छा आहे की, ७५ वर्षे मी तुमची सेवा केली, आणखी २५ वर्षे करावी. याचा पुरावा आज संध्याकाळच्या आत मला दाखवायचा आहे, एवढे बोलतो आणि आपली रजा घेतो
Subscribe to:
Posts (Atom)