Wednesday 11 December, 2013

अंगारमळ्याचे धडे, व शेतकरी भारताचा नागरिक नाही?



  •  
  •  
  • राखेखालचे निखारे अंगारमळ्याचे धडे
  • सुमारे ३६ वर्षांपूर्वी अंगारमळ्याच्या शेतजमिनीचा व्यवहार झाला. त्या जमिनीची पाहणी करीत असताना  एका ठिकाणी उभे राहून मला किडेकीटकांची माहिती आणि जमिनीची पातळी कशी काढावी याचे व्यावहारिक ज्ञान काही छोटय़ा मुलांकडून मिळाले. मात्र त्यांनी पुरवलेल्या या किरकोळ माहितीतून पुढे शेतकरी संघटनेचा महावृक्ष उभा राहील अशी शंकाही त्यांना वाटली नसेल..
    सन १९७६ च्या डिसेंबर महिन्यात शेवटी आंबेठाणच्या जमिनीचा व्यवहार ठरला. पुण्यातील एक वकील एम. पी. गुणाजी यांनी साठेखत तयार करून दिले आणि १ जानेवारी १९७७ रोजी अंगारमळ्याची जमीन ताब्यात घेण्याचा विधी पार पडला. हा विधी म्हणजे जुन्या मालकाने जमिनीतील थोडीशी माती उचलून नव्या मालकाच्या हातात देणे इतका साधासोपा असतो. त्यानंतर जमीन नव्या मालकाची होते आणि तो त्या जमिनीवर कोणतेही काम करण्यास मुखत्यार होऊन जातो.
    मला जमिनीचे काम करण्याची इतकी घाई होती की पहिल्याच दिवशी म्हणजे १ जानेवारी १९७७ रोजी आम्ही बांधबंदिस्तीच्या कामास सुरुवात केली. बांधबंदिस्ती आवश्यक होती, कारण अंगारमळ्याची सर्व जमीन ही दोन्ही बाजूंनी उताराची होती आणि दोन्ही उतारांच्या मध्ये एक ओढा वाहत होता. त्या उतारावर शेतजमीन करण्यासाठी जागोजाग बांध घालणे आवश्यक होते. प्रत्येक पावसात वाहून येणारे पाणी आणि माती बांधापाशी साठत जाते आणि जमिनीचे आपोआप सपाटीकरण होते. बांध घालण्याचे काम तसे सोपेच आहे. बांधाच्या रेषेच्या एका बाजूस जमीन खणून घ्यायची आणि त्यातून निघणारी माती रेषेच्या दुसऱ्या बाजूला टाकायची. या कामात सर्वात मोठे काम हे खणण्याचे असते. खणण्याचे काम चालू झाल्यावर जमिनीतून अनेक प्रकारचे किडे आणि कीटक निघू लागले. माझी या जगाशी काहीच ओळख नव्हती. माझ्या मनात विचार आला की या किडय़ाकीटकांचा एक संग्रह करावा आणि प्रत्येक किडय़ाकीटकाचे नाव तेथे लिहून ठेवावे. माझ्या शेजारीच जमिनीचे जुने मालक हजर होते, त्यांना मी तसे म्हणताच ते म्हणाले अशा तऱ्हेचे संग्रहालय करण्याची काहीच आवश्यकता नाही. गावातल्या अगदी लहान मुलालासुद्धा या प्रत्येक किडय़ाचे आणि कीटकाचे नाव माहीत आहे, एवढेच नव्हे तर गुणधर्मसुद्धा माहीत आहेत.
    त्यानंतर सगळ्या शेताचे कंटूर मॅिपग करण्याचे काम हाती घेतले गेले. यासाठी जागोजाग बांबू खोचून काही उपकरणांच्या मदतीने बांबूंची टोके समपातळीत आणावी लागतात. शेतावर काम करणारा एक मुलगा म्हणाला, 'यासाठी एवढय़ा उपकरणांची काय गरज आहे? खाली वाकून पाहिल्यावर जमिनीची पातळी सहज लक्षात येते.' तो मुलगा एका जागी उभा राहिला आणि खांदा कलवून डोके जमिनीच्या पातळीत आणून त्याने, तेथे पाणी सोडले तर कोणत्या दिशेने वाहत जाईल हे सांगितले. त्या वेळी मला सल्ला देण्याकरिता किलरेस्कर कंपनीचे तज्ज्ञ हजर होते. त्यांनीही त्या मुलाला सर्टििफकेट दिले की त्या मुलाने काढलेल्या जमिनीच्या पातळीत काहीही दोष नव्हता. त्यामुळे, पाण्याच्या वाहण्यावरून जमिनीची पातळी सहज काढता येऊ शकते हे कळले.
    या उदाहरणांवरून मला श्रीमती ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांच्या शाळेत घडलेल्या एका प्रसंगाची आठवण झाली. त्यांच्या शाळेच्या तपासणीसाठी काही विद्वान गेले असता त्यांनी विद्यार्थ्यांना सामान्यज्ञानाचे काही प्रश्न विचारले - अमक्या खात्याचा मंत्री कोण? वगरे वगरे. विद्यार्थ्यांना उत्तरे देणे फारसे जमले नाही. ताराबाईंनी हा सगळा प्रकार पाहून घेतला आणि तपासनीसांकडून जेवणाच्या सुट्टीपर्यंत वेळ मागून घेतला. सुट्टीच्या वेळात त्यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या झाडांची पाने गोळा करून आणण्यास सांगितले. पाने गोळा झाल्यानंतर त्यांनी एकेका विद्वान तज्ज्ञाला ही पाने कोणकोणत्या झाडांची आहेत असा प्रश्न विचारायला सुरुवात केली. विद्वान तज्ज्ञ अर्थातच गडबडून गेले. याउलट, ताराबाईंच्या विद्यार्थ्यांना त्या त्या पानाच्या झाडाचे नाव एवढेच नाही तर त्या झाडांचे औषधी गुणही तोंडपाठ होते.
    यावरून एक महत्त्वाचा धडा मी शिकलो आणि मनात कोठेतरी त्याची नोंद करून घेतली. शेतकरी हा अडाणी आणि अज्ञानी असतो ही गोष्ट खोटी आहे हा युक्तिवाद करण्याकरिता पुढे मला हे शहाणपण खूप उपयोगी पडले. शेतकरी संघटना स्थापन झाल्यानंतर अनेक विद्वानांनी माझ्याशी वादविवाद करण्याकरिता अनर्गळ मुद्दे उठवले- शेतकऱ्यांच्या हाती पसा आला तर ते त्याचा उपयोग दारू पिण्याकरिता करतील वगरे वगरे. माझ्या अनुभवातून जे मला कळले होते ते हे की उत्पन्न वाढल्यानंतर सगळेच लोक काही हौसमौज करण्याकरिता त्याचा एक भाग वापरतात; त्यातल्या काहींना दारू पिण्यात हौसमौज वाटते. प्राध्यापकांचीही अशी प्रवृत्ती मला प्रत्यक्ष अनुभवाने कळलेली होती. सरकारी नोकरीत राहिल्यामुळे कलेक्टर इत्यादी उच्चपदस्थ लोकसुद्धा पहिल्या पगाराचा अशाच तऱ्हेने विनियोग करू पाहतात हेही मला अनुभवाने कळले होते. मग, शेतकऱ्यांनी त्यांची नवी मिळकत आनंदाच्या भरात थोडीशी उधळमाधळीने गरवापराने खर्च केली तर त्याबद्दल एवढे आकांडतांडव करण्याचे काहीच कारण नाही.
    हाच युक्तिवाद, 'शेतकरी लग्नात किंवा उत्सवप्रसंगी अवास्तव खर्च करतात' या दोषारोपाची वासलात लावण्याकरिता उपयोगी पडला. त्यासाठी तर प्रत्यक्ष महात्मा जोतिबा फुले यांचाच आधार होता. अगदी श्रीमंत श्रीमंत म्हटल्या गेलेल्या पाटलाच्या घरीसुद्धा लग्नासारख्या प्रसंगी जेवणावळ म्हणजे काय असते याचे तपशीलवार वर्णन जोतिबांनी बारकाईने केले आहे. '.. देवकार्याचे दिवशी सर्वानी आपापल्या घरून पितळ्या घेऊन आल्यानंतर त्यामध्ये ज्वारीच्या भाकरी, कण्या अथवा बाजरीच्या घुगऱ्याबरोबर सागुतीचे बरबट, ज्यामध्ये दर एकाच्या पितळीत एकदा चार अथवा पांच आंतडी-बरगडय़ाचे रवे पडले म्हणजे जेवणारांचें भाग्य..' असे स्वत: जोतिबा फुल्यांनीच 'शेतकऱ्याचा आसूड' या त्यांच्या पुस्तकात वर्णन केले आहे.
    शेतकऱ्यांतील अगदी लहान मुलानेसुद्धा दाखवलेल्या सामान्यज्ञानानंतर माझ्या मनात विचार आला की आय. ए. एस.च्या परीक्षेतील सामान्यज्ञानाचे प्रश्न थोडे शेतीसंबंधित केले तर आज उत्तीर्ण होणारे बहुतेक अधिकारी सपशेल अपयशी होतील. परीक्षेतील उत्तीर्णता ही प्रश्नांच्या कलावर अवलंबून असते. प्रश्न जर या एकाच प्रकाराने विचारले गेले तर शेतकरी मुले सहज उत्तीर्ण होतील, हा निष्कर्षही मनात तयार झाला. यापुढची पायरी म्हणजे, कोणत्या गुणवत्तेच्या निष्कर्षांने कलेक्टर इत्यादी उच्चाधिकाऱ्यांची नेमणूक होते? त्यात खरोखर त्यांच्या बुद्धिमत्तेची परीक्षा होते काय? माझ्या मनात एक गमतीशीर विचार आला. सगळ्यात जास्त बुद्धी वापरण्याचे काम बसचा कंडक्टर करतो असा तो निष्कर्ष होता. एका स्टॉपवरून दुसऱ्या स्टॉपवर जाण्याकरिता प्रत्येक वेळी वेगळा हिशेब मनातल्या मनात त्याला करावा लागतो. माझी सगळी दुनिया पालटली. शेतकरी अडाणी आहे, आळशी आहे, उधळ्या आहे, व्यसनी आहे या साऱ्या कल्पना पार पुसून गेल्या आणि शेतकऱ्याचे वासाहतिक पद्धतीने शोषण होत असल्यामुळेच तो गरीब राहतो, कर्जबाजारी राहतो असा मनाशी निश्चय झाला.
    यानंतरचे काम हे केवळ पुस्तकी होते. पुण्यातील गोखले इन्स्टिटय़ूटच्या ग्रंथालयात जाऊन शेतकऱ्यांच्या शोषणासंबंधातील पुरावे आणि माहिती गोळा करणे हे तसे सोपे होते. शेतीतील काबाडकष्टांच्या तुलनेने ग्रंथालयातील खुर्चीत बसून पुस्तके वाचणे, टिपणे काढणे हे काम सोपेच म्हणायचे. त्यात मला थोडी नशिबाची साथ मिळाली. रशियामध्ये स्टॅलिनच्या काळात प्रियाब्रेझेन्स्की आणि बुखारीन यांच्यात झालेल्या वादविवादाची माहिती मला अशोक मित्रा यांच्या 'Terms of Trade and Class Relations' या छोटय़ा पुस्तकात मिळाली. बहुतेक विद्वानांना आणि संशोधकांना अशा नशिबाच्या लाटेचा फायदा मिळतोच. माझी मांडणी कोणाही मायकेल लिप्टनसारख्या एखाद्या लेखकाच्या मांडणीवर झालेली नसून त्यासाठी अनेक संदर्भ आणि माझे शेतीतील अनुभव उपयोगी पडले आहेत. आणि, त्याखेरीज माझ्या व्यापक वाचनाचाही - त्यात अनेक विषय आले, अनेक भाषांचा अभ्यासही आला - मला उपयोग झाला. तसेच फ्रान्ससारख्या देशातील शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष केलेल्या आंदोलनाचा अनुभवही त्याच्या मागे आहे. आणि त्यातून शेतकरी संघटनेच्या अर्थविचाराची मांडणी आणि आंदोलनाची साधने तयार झाली. अंगारमळ्याच्या शेतातील एका ठिकाणी उभे राहून मला किडय़ाकीटकांची माहिती देणाऱ्या आणि जमिनीची पातळी कशी काढावी याचे व्यावहारिक ज्ञान देणाऱ्या त्या छोटय़ाशा मुलांना त्यांनी पुरवलेल्या या किरकोळ माहितीतून पुढे शेतकरी संघटनेचा महावृक्ष उभा राहील, अशी शंकाही वाटली नसेल. शेतकरी संघटनेच्या विचाराची विशेषता अशी की कांद्याच्या भावाच्या प्रश्नापासून ते विश्वाचा निर्मिक कोण, त्याचे स्वरूप काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी, कोणत्याही तऱ्हेची ठिगळे न वापरता एका धाग्याने विणलेले ते एक महावस्त्र आहे







शेतकरी भारताचा नागरिक नाही?

शेतमालाचे रास्त दर न देता, उणे सबसिडी लादून कर्जे किंवा वीजबिलही थकवण्याखेरीज पर्यायच उरू नये, अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर लादली जाते आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी उत्तुंग कार्य केलेल्यांचा विचार 'भारतरत्न'साठी होत नाही..  शेतकरी आणि कोणतेही अन्य समाजघटक यांना वेगवेगळ्या फूटपट्टय़ा लावल्या जातात, हेच खरे.
मुंबईत १६ नोव्हेंबर २०१३ रोजी झालेल्या बँक अधिकाऱ्यांच्या वार्षकि परिषदेत रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर के. सी. चक्रवर्ती यांनी एक धक्कादायक माहिती दिली. २००८ साली केंद्रीय अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांची ६० हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली त्या वेळी याबद्दल ज्या मोठमोठय़ा कंपन्यांनी तक्रार केली होती, त्याच कंपन्यांची जवळजवळ एक लाख कोटींची कर्जे बँकांनी माफ केली आहेत, असे रिझर्व बँकेने गेल्या वर्षभरात गोळा केलेल्या माहितीवरून लक्षात आले, असा गौप्यस्फोट चक्रवर्ती यांनी या परिषदेत केला. या बातमीनंतर चक्रवर्ती यांच्याकडे 'हा कोण संप्रती नवा पुरुषावतार शेतकऱ्यांचा कैवार घेणारा?' अशा भावनेने शेतकरी पाहू लागले असतील. शेतकरी आणि इतर समाजघटक यांच्याबद्दल विचार करताना ज्या वेगवेगळ्या फूटपट्टय़ा लावल्या जातात त्याचे एक उदाहरण चक्रवर्तीनी दिले आहे एवढेच.
खरे म्हटले तर चक्रवर्तीनी जाहीर केलेली माहिती तशी अपुरीच आहे. शेतकऱ्यांवरील थकीत कर्जे आणि कंपन्यांवरील थकीत कर्जे यांची, तसे पाहिले तर, तुलनाच होऊ शकत नाही. शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला सरकारी धोरणामुळे यथोचित भाव मिळत नाही, हे शेतकऱ्यांवर  कर्जे चढण्याचे मुख्य कारण आहे. सरकार त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये रास्त भाव मिळू देत नाही. शेतकऱ्यांवरची कर्जे ही एका दृष्टीने पाहिले तर बेकायदा व अनतिक आहेत. करार कायद्याप्रमाणे करारातील एक पक्ष दुसऱ्या पक्षाला कराराचे पालन करता येऊ नये अशी व्यवस्था करीत असेल, तर तो करारच बेकायदा ठरतो. सरकार शेतकऱ्याला कर्ज देते किंवा देण्याची व्यवस्था करते आणि शेतकऱ्यांवर उणे सबसिडीचे धोरण लादून ते कर्जच नव्हे, तर शेतीतील सर्वात मोठा खर्च म्हणजे वीजबिल तेही भरता येऊ नये अशी व्यवस्था करते. या अर्थाने शेतकऱ्यावरील कर्ज आणि वीजबिलांची थकबाकी दोन्ही बेकायदा ठरतात.
या दोन्ही थकबाक्या अनतिकही आहेत. कारण उणे सबसिडीच्या धोरणामुळे, १९८१ ते २००० या वीसच वर्षांचा हिशेब केला तरी सरकारच शेतकऱ्यांचे किमान ३ लाख कोटी रुपयांचे देणे लागते. त्या मानाने शेतकऱ्यांवर दाखवले जाणारे, राधाकृष्णन समितीच्या अहवालानुसार, १ लाख १३ हजार कोटींचे एकूण संचित कर्ज किरकोळ आहे; कर्जमाफीची ६० किंवा ७८ हजार कोटी रुपयांची रक्कम तर नगण्यच आहे. त्यामुळे नादारीचे अर्ज भरून किंवा इतर कोणत्याही मार्गाने शेतकऱ्यांनी ही कर्जे फेडण्याचे नाकारल्यास त्यात बेकायदा वा अनतिक असे काहीच नाही.
कंपन्यांवर शेतकऱ्यांप्रमाणे कोणतीच उणे सबसिडी नाही, उलट त्यांना सरकारकडून निर्यात अनुदान इत्यादी अनेक सवलती मिळतात. त्यामुळे शेतकऱ्यांची माफ झालेली कर्जे व बडय़ा कंपन्यांची माफ झालेली कर्जे यांची तुलना अप्रस्तुत आहे. परंतु शेतकऱ्यांना अशा तऱ्हेने दीड दांडीच्या तराजूचे माप घेण्याची सवय झाली आहे. एकदा शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळू द्यायचे नाही असे ठरले की मग त्याला जी जखम होते, त्या जखमेवर कोणताही कावळा टोच मारून जाऊ शकतो. आणि ही जखम चिघळत गेली की त्यानंतर त्याचे अनेक वेगवेगळे परिणाम दिसू लागतात.
आपल्या देशात न्यायदेवतेसमोर सर्व जण सारखे आहेत अशी एक समजूत आहे. पण शेतकऱ्यांच्या बाबतीत ती खरी नाही. मी सत्याग्रहासाठी तुरुंगात असताना आसपासच्या कोठडीत कोण कोण कैदी आहेत, यासंबंधी छोटासा अभ्यास केला होता. माझ्या लक्षात हे आले, की शेजाऱ्याशी बांधावरून भांडणे झाल्यामुळे तिरीमिरीने हातातील कुऱ्हाड किंवा दांडके शेजाऱ्याच्या डोक्यात घातल्यामुळे फाशीची किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊन वर्षांनुवष्रे कोठडीत खितपत पडलेल्या शेतकऱ्यांचीच तेथे भर होती. या उलट, थोडेफार इंग्रजी शिकलेला किंवा साक्षर असा कोणीही कैदी तेथे भेटला नाही. कारण गुन्हे केलेल्या अशा गुन्हेगारांची कोणत्या ना कोणत्या पातळीवर किंवा कोर्टात तरी सुटका होऊन जाते. 'इंडिया-भारत' संघर्ष किती खोलवर गेलेला आहे याची कल्पना मला येत गेली तसतसे मी वेगवेगळ्या राज्यांतील हायकोर्टात जाऊन तेथील वकिलांसमोर 'शेतकऱ्यांची न्यायव्यवस्था समानतेची आहे काय?' या विषयावर भाषणे दिली.
गमतीची गोष्ट अशी की, चक्रवर्तीसाहेबांनी ज्या दिवशी वरील गौप्यस्फोट केला त्याच्या आसपासच प्रसिद्ध मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना 'भारतरत्न' दिल्याचे जाहीर झाले.

पण शेतकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांसाठी कार्य करणाऱ्या किती जणांना पद्म पुरस्कार मिळाले याचा अभ्यास केल्यास शासनाचा शेतीक्षेत्राविषयीचा दुस्वास स्पष्ट होऊन जातो. शेतीक्षेत्रामध्ये पद्म पुरस्कारपात्र शास्त्रज्ञ, शेतकरी झाले नाहीत असे नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात ज्यांनी प्रचंड कामगिरी करून दाखवली त्या सर छोटूराम यांच्यासारखे दिग्गज नेतेही शासनाच्या दृष्टीने पद्म पुरस्कारास पात्र ठरलेले नाहीत. सर छोटूराम हे स्वातंत्र्यपूर्व पंजाबमधील सुप्रसिद्ध शेतकरी नेते होते. त्यांनी स्थापन केलेल्या 'युनियनिस्ट पार्टी ऑफ इंडिया' या पक्षाची सत्ता पंजाबमध्ये अनेक वष्रे चालली. या पक्षाने हिंदू, शीख आणि मुसलमान यांची खऱ्या अर्थाने एकी करून दाखवली; इतकी पक्की की सर छोटूराम हयात असेपर्यंत जीनांना पंजाबमध्ये पायसुद्धा ठेवता आला नाही. सर्वधर्मीयांची एकी घडवून आणणाऱ्या या पक्षाचे काँग्रेसशी कधी जुळले नाही. याही कारणाने सर छोटूराम यांना कोणताही पद्म पुरस्कार मिळाला नसण्याची शक्यता आहे.
सर छोटूराम यांचा भारतातील स्थितीबद्दल अभ्यास गाढ होता. त्यांनी खुद्द महात्मा गांधींनाही दोन गोष्टींबद्दल प्रेमाची सूचना केली होती. पहिली सूचना अशी, की सार्वजनिक जीवनात धर्म आणला जाऊ नये. सर छोटूराम स्वत: आर्यसमाजी होते. पण ते म्हणत, की मी माझ्या घराच्या चार िभतींच्या आत आर्यसमाजी आहे, भिंतींच्या बाहेर पडल्यानंतर मला कोणताही धर्म नाही आणि जात नाही. या विचारामुळेच त्यांना युनियनिस्ट पार्टीचे यश संपादन करता आले. त्यांनी केलेली दुसरी सूचना अशी, की इंग्रजांनी अलीकडेच आपल्या देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था स्थापन केली आहे. इंग्रजांची भारताला ही फार मोठी देणगी आहे. तेव्हा महात्मा गांधींनी आंदोलनासाठी कोणताही मार्ग शोधावा, पण लोकांना कायदेभंग करायला शिकवू नये.
सर छोटूराम यांनी जी मोठी कामे करून दाखवली त्यांत शेतकऱ्याची जमीन कोणाही सावकारास काढून घेता येऊ नये अशी तरतूद असणारा कायदा Land Alienation Act   त्यांनी पंजाबात संमत करून घेतला. गमतीची गोष्ट अशी, की लाला लजपत राय यांनी या कायद्यास प्रकट विरोध केला होता.
सर छोटूरामांची गोष्ट बाजूला ठेवू या, पण ज्यांनी १९६० ते १९७० या दशकात देशात घडून आलेल्या हरितक्रांतीचे बीज रोवले आणि देशाला अमेरिकेतून येणाऱ्या भिकेच्या िमधेपणातून सोडवण्याचा मार्ग खुला केला त्या लाल बहादूर शास्त्री यांना तरी 'भारतरत्न' देण्यात काहीच प्रत्यवाय नव्हता. लाल बहादूर शास्त्री यांनी १९६५ साली 'जय जवान, जय किसान' ही घोषणा दिली. एवढेच नव्हे, तर अमेरिकेतील गव्हाची आयात बंद होण्याचा धोका पत्करून लोकांना आठवडय़ात एक वेळचे जेवण न घेण्याचा सल्ला देऊन पाकिस्तानच्या आक्रमणाचा मुकाबला करण्याचे धाडस दाखवले. त्याशिवाय, त्यांनी रोवलेल्या हरितक्रांतीमुळे देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. आज भूतकाळात होऊन गेलेल्या अनेक पंतप्रधानांना भारतरत्न न मिळाल्याबद्दल आरडाओरड होते आहे, पण लाल बहादूर शास्त्रींचे नाव या आरडाओरडीतही कुठे येत नाही. याचे कारण ते शेतकरी समाजाचे नेते होते हेच असावे. लाल बहादूर शास्त्री हे राजकारणी व्यक्ती म्हणून त्यांची गोष्ट बाजूस ठेवली तरी वेगवेगळ्या वनस्पतींच्या जातिप्रजाती शोधून काढणारे अनेक शेतकरी, शास्त्रज्ञ गावोगाव अंधारात लोपले आहेत. सर्व हरितक्रांतीच्या तंत्रज्ञानाचा पुरस्कार करणारे आणि देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याच्या कार्यात मोठा वाटा उचलणारे डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांना सर्व काही आदरस्थाने मिळाली, पण त्यांना कधी भारतरत्न पुरस्कारास पात्र समजले गेले नाही.
सर्व देशांतील शेतकऱ्यांविषयी समाजाची आणि सरकारची जी द्वेषभावना आहे तिचे कारण काय? कदाचित देशातील प्रचलित जातिव्यवस्था हे त्यामागील एक कारण असू शकेल. पण एवढय़ा कारणाने एका सबंध समाजाला कर्जाच्या नरकात खितपत ठेवण्याची शिक्षा देणे फारच अन्यायाचे होते.
* लेखक हे अर्थतज्ज्ञ आणि 'योद्धा शेतकरी' म्हणून गौरवले    गेलेले शेतकरी संघटनेचे संस्थापक आहेत.
त्यांचा ई-मेल  sharadjoshi.mah@gmail.com

No comments:

Post a Comment