- (प्रतिनिधी)
Tuesday, December 25, 2012 AT 12:15 AM (IST)
Tags: sharad joshi, farmer, agrowon, beed
शरद जोशी; मोरेवाडी येथे ज्ञानश्री पुरस्काराचे वितरण
अंबाजोगाई, जि. बीड- या देशातील शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत आपण डोळे मिटणार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आपण लढतच राहणार, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी येथे केले.
अंबाजोगाई, जि. बीड- या देशातील शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत आपण डोळे मिटणार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आपण लढतच राहणार, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी येथे केले.
तालुक्यातील मोरेवाडी येथील ज्ञानश्री प्रतिष्ठानतर्फे शरद जोशी यांना ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांच्या हस्ते "ज्ञानश्री पुरस्कार' प्रदान करण्यात आला, त्या प्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशीव, रघुनाथ पाटील, श्रीरंगराव मोरे, भास्करराव बोरावकर, माजी आमदार वामनराव चटप, पाशा पटेल, प्रा. शेषराव मोहिते हे या वेळी उपस्थित होते.
या वेळी जोशी म्हणाले, की संत ज्ञानेश्वर, मुकुंदराज स्वामी यांनी त्यांच्या काळात शेतकरी चळवळ निर्माण केली. वारकरी सांप्रदायातूनच आपणाला शेतकरी आंदोलनाची प्रेरणा मिळाली. शेतकरी संघटनेत अनेक कार्यकर्ते तयार झाले, त्यातले काही निघून गेले; परंतु तेही जोमाने काम चालवतात याचा आनंद आहे. माझ्याही काही चुका झाल्या असतील, तर त्या त्यांनी पोटात घालाव्यात आणि परत संघटनेत यावे. उसाच्या भावासंदर्भात झालेल्या आंदोलनापासून सर्व संघटना एकत्रित आल्या, ही नवी सुरवात आहे.
रा. रं. बोराडे म्हणाले, की शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे, या प्रश्नाची पेरणी शरद जोशी यांनी केली. अंगावर गोळी झाडली तरी ती झेलायची ही ताकद शेतकरी संघटनेने निर्माण केली. त्यांच्या व संघटनेच्या विचारांचा ग्रामीण साहित्यावर प्रभाव निर्माण झाला. अलीकडे शेतीच्या प्रश्नांची व्याप्ती वाढली आहे, त्यासाठी नव्या विचारांनी दिशा ठरवून पुढे जावे लागणार आहे.
प्रा. भास्कर चंदनशीव म्हणाले, की शेतकरी संघटना ही विचार पद्धती आहे, त्यातून शेतकऱ्यांकडे गांभीर्याने पाहण्याचा दृष्टिकोन निर्माण झाला. शेतकरी संघटनेच्या आंदोलनांतून प्रतिभाशाली विचार उभे राहिले आहेत.
रघुनाथदादा पाटील म्हणाले, की शरद जोशींनी आम्हाला प्रश्नांच्या मुळाशी जायला शिकवले. आम्ही त्यांच्या शाळेत शिकलो याचा आनंद आहे. या वेळी प्रा. शेषराव मोहिते व ऍड. सच्चिदानंद मोरे यांनी ज्ञानश्री प्रतिष्ठानच्या पुरस्कारांमागील भूमिका स्पष्ट केली.
कार्यक्रमाचा प्रारंभ दीप प्रज्वलन, ज्ञानेश्वरी व ग्रंथ पूजनाने झाला. सूत्रसंचालन प्रा. केशव देशपांडे यांनी केले. स्वागत रविकिरण मोरे यांनी केले. राहुल मोरे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment