Thursday, 13 December 2012

शेतकरी संघटना - उदय आणि विस्तार - स्टार माझा

शेतकरी संघटना काय आहे?

स्टार माझा वेब टीम, मुंबई

Saturday, 12 November 2011
मुंबई : ऊसाला 2350 रूपये भाव मिळावा यासाठी ज्या तीन संघटना गेल्या आठवड्याभरापेक्षा जास्त काळ आंदोलन करत होत्या ती खरी एकच संघटना आहे आणि ती म्हणजे शेतकरी संघटना. शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेची स्थापना आणि उभारणी केली ती १९८० च्या काळात. यूनोतली बड्या हुद्यावरची नोकरी सोडून जोशी भारतात परतले आणि २२ एकर कोरडवाहू जमीन घेऊन शेती करू लागले. त्यात त्यांना आलेल्या अनुभवातून जोशींनी शेतीचं अर्थशास्त्र नव्यानं मांडलं.
उत्पादन खर्चावर आधारीत किंमत शेतकऱ्यांना मिळाली तर त्यांची गरीबीतून सुटका होईल आणि तोट्यातली शेती शेतकऱ्यांच्या नशीबानं नाही तर सरकारच्या धोरणानं असल्याचं जोशींनी शास्त्रशुद्द पद्धतीनं मांडलं. जे शेतकऱ्यांनाही पटलं.
शेतकरी संघटनेनं कुठली आंदोलनं लढली?
सरकारकडे कायम अनुदान मागणाऱ्या शेतकऱ्यांना जोशींनी भीक नको घेऊ घामाचे दाम, शेतकरी तितुका एक एक असा नवा मुलमंत्र दिला आणि महाराष्ट्रात 80 च्या दशकात शेतकऱ्यांचा आगडोंब रस्त्यावर आला. 1980 मध्ये शरद जोशींनी पहिलं कांद्याचं आंदोलन केलं ते चाकन परिसरात. त्याला शेतकऱ्यांचा अभूतपुर्व प्रतिसाद मिळाला. त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये नाशिक जिल्ह्यातच जोशींच्या नेतृत्वाखाली ऊसाचं आंदोलन पेटलं. शेतकरी पुन्हा रस्त्यावर आले.
सरकारनं शेतकऱ्यांवर गोळीबार केला. तीन शेतकरी मारले गेले. लातूर जिल्ह्यातल्या पानगावमधल्या आंदोलनातही एका शेतकऱ्याला जीव गमवावा लागला. जोशींच्या नव्या आर्थिक विचारानं शेतकऱ्यांमध्ये जागृती यायला लागली. निपाणीत परत वर्षभरातच तंबाखुचं आंदोलन झालं. त्यालाही तेवढाच प्रतिसाद मिळाला. ऊस, कांदा, तंबाखु यांच्या आंदोलनानंतर जोशींनी कापसाचा प्रश्न हाती घेतला. ठिकठिकाणी त्यांनी नव्यानं उत्पादन खर्चावर आधारीत किंमतीची नव्यानं मांडणी केली.
१९८६ मध्ये विदर्भ मराठवाड्यात कापसाच्या प्रश्नावर आंदोलन झालं. पुन्हा शेतकरी जोशींच्या हाकेला ओ देत रस्त्यावर उतरले. सरकारनं आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. हिंगोली जिल्ह्यातल्या सुरेगावमध्ये तीन शेतकऱ्यांना पोलिसांच्या गोळीबारात प्राण गमवावे लागले. फक्त शेतीच नाही तर चांदवडला शेतकरी संघटनेचं महिला अधिवेशन झालं आणि त्यात पहिल्यांदाच महिलांच्या प्रश्नावर आधारीत जोशींनी मांडणी केली जी संघटनेसाठी टर्निंग पॉईंट ठरली.
शेतकरी संघटनेनं कुठले राजकीय नेते दिले?
शरद जोशींचे विचार हे चळवळीचे आहेत त्यातून शेतकरी संघटना ही चळवळ म्हणून उदयाला आली. एक सशक्त दबावगट म्हणून तिला मोठं यश मिळालं. पण राजकारणात जाणार नाही म्हणणाऱ्या शरद जोशींनी निवडणुकीच्या मैदानातही उडी मारली आणि इथूनच संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. विशेष म्हणजे १९९० च्या विधानसभा निवडणुकीत एक नाही दोन नाही तर चक्क पाच आमदार शेतकऱी संघटनेचे निवडून आले. पण चळवळ आणि राजकारण यांचा मेळ घालता आला नाही. परिणामी ९५ च्या निवडणुकीत दोनच आमदार राहिले.
काही जणांनी संघटनेतून बाहेरपडून वेगळी राजकीय चूल मांडली आणि राजकीय पदं भूषवली. त्यात मग अनिल गोटे, आर एम वाणी, शंकर धोंडगे, पाशा पटेल आणि आताचे राजू शेट्टी त्यापैकीच एक. सद्यस्थितीत शेतकरी संघटना तीन गटात विभागली गेलीय. पण तिघांचाही आत्मा एकच आहे आणि तो म्हणजे शरद जोशींनी वेळोवेळी केलेली आर्थिक मांडणी. त्याच मांडणीवर मग राजू शेट्टी कधी उस उत्पादकांचं आंदोलन यशस्वी करतात तर कधी रघुनाथदादा पाटील सांगलीत धुमाकुळ घालतात.
विदर्भात वामनराव चटप कापसाचं आंदोलन करतात तर मराठवाड्यात एखादा साधा बिल्ला लावलेला कार्यकर्ताही आर्थिक धोरणावर पद्धतशीर बोलतो. दुर्देवं एवढच की विचार एक असतानाही संघटना मात्र एक राहू शकली नाही.
------------------------------------------------------------------------------------------------------------स्टार माझावर
काल १२ नोव्हेबर २०११ ला स्टार माझावर प्रसारीत झालेला विशेष कार्यक्रम   

उषःकाल होता होता

उषःकाल होता होता, काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली

अम्ही चार किरणांची ही आस का धरावी
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली

तेच घाव करिती फिरुनी ह्या नव्या कट्यारी;
तेच दंश करिती आम्हा साप हे विषारी !
अम्ही मात्र ऐकत असतो आमुची खुषाली !

तिजोर्‍यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती
आम्हावरी संसाराची उडे धूळ माती
आम्ही ती स्मशाने ज्यांना, प्रेत ही ना वाली

अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी ?
असा कसा जो तो येथे होतसे खरेदी ?
ह्या अपार दु:खाचीही चालली दलाली !

उभा देश झाला आता एक बंदिशाला
जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला
कसे पुण्य दुर्देवी अन पाप भाग्यशाली

धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे!
अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे !
आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली !

                                - सुरेश भट      आता उठवू सारे रान
आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण

किसान मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील
एकजुटीची मशाल घेउनी पेटवतिल हे रान

कोण आम्हा अडवील, कोण आम्हा रडवील
अडवणूक त्या करणारांची उडवू दाणादाण
शेतकऱ्यांची फौज निघे, हातात त्यांच्या बेडि पडे
तिरंगि झेंडे घेऊन गाती स्वातंत्र्याचे गान

पडून ना राहू आता, खाऊ ना आता लाथा
शेतकरी अन्‌ कामकरी मांडणार हो ठाण

                                       - साने गुरुजी---------------------------------------------

डोंगरी शेत माझं गं

डोंगरी शेत माझं गं मी बेनू किती?
आलं वरिस राबून मी मरावं किती?
कवळाचे भारे बाई गं घेऊन चढावं किती?
आडाचं पाणी बाई गं पाणी वढावं किती?
घरात तान्हा माझा गं तान्हा रडंल किती?
तान्ह्याचं रडं ऐकून
पान्हा येईल किती?
आलं आलं वरीस जमिन नांगरुन
उभं पीक नाचे सोन्यानं फुलून
पर एक मेला सावकार ठोला
हिसकून घेतो बाई सोन्याचा गोळा
असं उपाशी राहून
आम्ही मरावं किती?
या संसारा बाई सांजी येईना
रक्त गाळून अंगा धडूत मिळंना
कष्टाचं फळ बाई पदरात पडंना
टीचभर पोटाला,
हातभर देहाला जपावं किती?
अक्षय ऱ्हाया कुंकू कपाळा
संसार वेलीच्या फुलवाया फुला
रुप नवं आणू माय धरतीला
तोडू जुलमाचे काच, हे रावणी फास
एकीचं निशाण हाती
- नारायण सुर्वे
---------------------------------------

No comments:

Post a Comment