Monday, 31 December 2012

येणार्‍या काळात शेती हाच पर्याय- शरद जोशी


"लोकमत"


(31-12-2012 : 00:37:54)

चंद्रपूर। दि. ३० (शहर प्रतिनिधी)
... खेड्यात आज ४७ टक्के लोकसंख्या उरली आहे. खेड्यातील युवकांचा कल शहराकडे आहे. अशा अवस्थेमध्ये येणार्‍या १० वर्षात रोजगार म्हणून शेतीकडेच वळावे लागेल, कारण तोच पर्याय शिल्लक उरणार आहे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार शरद जोशी यांनी केले.
येथील शुभम मंगल कार्यालयात शेतकरी संघटनेची दोन दिवशीय महाराष्ट्र राज्य संयुक्त कार्यकारिणी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचा आज समारोप होता. याप्रसंगी ते बोलत होते.

स्वतंत्र भारत पक्षाचे प्रातांध्यक्ष व माजी आमदार अँड. वामनराव चटप, शेतकरी संघटनेचे प्रांताध्यक्ष रवी देवांग, शेतकरी महिला आघाडीच्या शैलजा देशपांडे, माजी आमदार सरोजताई काशिकर, अनिल धनवट, संजय कोले उपस्थित होते. शेतमालाला रास्त भाव व व्यवस्थापरिवर्तनाची लढाई या बाबींना अनुसरून चंद्रपूर येथे ८,९ व १0 नोव्हेंबर २0१३ या कालावधीत राष्ट्रीय अधिवेशन घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. बैठकीत शरद जोशी पुढे म्हणाले, कापसाचे प्रचंड उत्पादन असताना आणि भूगर्भात खनिज संपती असतानाही विदर्भावर सतत अन्याय झाला आहे. विदर्भावरील अन्याय दूर करायचा असेल तर वेगळ्या विदर्भाशिवाय पर्याय नाही. महिला संरक्षणाचा सध्या ऐरणीवर आलेल्या मुद्याचा संदर्भ देऊन ते म्हणाले, सध्या कायद्यातील तरतुदी व अपराध्यांना शिक्षा यात समन्वय नसल्याने परिणामकारक शिक्षा शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. या बैठकीत देशातील सामाजिक, आर्थिक व राजकीय परिस्थितीचा सांगोपांग आढावा घेऊन आगामी कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यात आली. यावेळी रंगराजन समितीच्या अहवालावरही चर्चा करण्यात आली. हा अहवाल लागू करण्यासाठी शासनावर दबाव टाकण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

यावेळी अँड. वामनराव चटप, रवी देवांग, सरोज काशिकर, शैलजा देशपांडे, संजय कोले, अनिल धनवट, गुणवंत हंगर्णेकर, अनिल ठाकूरवार, गंगाधर मुटे, विलास मोरे, दिलीप भोयर, अँड. दिनेश शर्मा, प्रभाकर दिवे, रसिका उलमाले यांनीही आपली मते मांडली. या बैठकीत एफडीआयविषयी माहिती देण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले.
--------------------------------------------------------------------------
See More
 

No comments:

Post a Comment