शरद जोशी : माझा भाऊ
ec 18, 2011, 04.04AM IST
चतुरंग प्रतिष्ठानचा यंदाचा सामाजिक क्षेत्रीय जीवनगौरव पुरस्कार शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांना १८ डिसेंबरला कालिदास नाट्यमंदिर, मुलुंड येथे होणाऱ्या सोहळ्यात केंदीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते दिला जाणार आहे. या निमित्ताने शरद जोशी यांच्या भगिनी सिंधूताई जोशी यांचे मनोगत...
........ शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी हा माझा धाकटा भाऊ. आम्ही सहा भावंडे. पैकी नमाताई सर्वांत मोठी. मी, बाळ व शरद असे चौघे पाठोपाठचे. प्रत्येकात साधारण दीड-अडीच वर्षांचे अंतर. त्यामुळे नमा-सिंधु व बाळ-शरद अशा जोड्या अगदी घट्ट, आजपावेतो. नंतरचे येशू आणि मधू, पाच वर्षांच्या अंतराने. भावंडे म्हणून माया पण ती लहान, ही भावना कायम. साताऱ्याला कुंभाऱ्यांच्या घरात होतो तेव्हाच्या अनेक आठवणी अजूनही मनात रुंजी घालतात. संध्याकाळी मांडी घालून रामरक्षा म्हणत असू. नमाताई अतिशय गोंडस व चुणचुणीत. आणि बाळ पहिला मुलगा. फार लाडका, पण अति खोडकर. मी भित्री आणि शरद शांत. खोड्या केल्यावर सर्वांनाच मार मिळे. शरदचे नाव नमाताईने प्रेमाने ठेवले. ऋषिपंचमीला जन्माला आलेला शरद आमच्या सर्वांत सावळा, पण मुलायम त्वचा व मऊ केस, अंगाने गुटगुटीत. आई म्हणायची, 'सुदृढ बालक स्पधेर्त बक्षिस मिळाले असते.' साताऱ्याला तुळजाराम मोदींच्या घरी नंतर आम्ही राहू लागलो. घर मोठे, माडीवरचे, सारवलेल्या जमिनी. बाळ-शरदची जोडी रेल्वेचे रूळ जमिनीवर उकरणे, विहीर खणणे असे उद्योग करीत. पिण्यासाठी विहिरीचे पाणी दुरून आणायला नको हा विचार. मग खालच्या डोंगरे आजी, आईला हाका मारायच्या, 'रमाबाई, माती पडते.' अशा डोकेबाज खेळाचा मग 'प्रसाद' मिळत असे. याच घरात असताना माडीवरून दसऱ्याचे संचलन करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक रस्त्यावरून रपेट करताना दिसत. त्यांचा एकसारखा वेष, टोपी, बूट, ऐटीत चालणे पाहून दोघा भावांना स्फूतीर् आली. जमवलेले चिंचोके चार-चारच्या ओळींत लावले व परेड केली. चालणार कशी तर हाताने हलवीत पुढे नेणे. कितीतरी वेळ हा खेळ चाले, अगदी मनापासून. वडिलांची सातारहून बेळगावला बदली झाली. तेव्हा डॉ. लोकूरांच्या आऊटहाऊसमध्ये ठळकवाडीत रहात होतो. बाळला पाटकर मास्तर शिकविण्यासाठी येत. शिकवणी चालत असताना शरद जवळपास असे. बाळच्या आधीच प्रश्नाचे उत्तर, उजळणी, पाढे शरदच म्हणे; धडे न वाचता घडाघड म्हणे. तेव्हा त्याला एकदम तिसरीत रजपूत बंधूंच्या शाळेत दाखल केले. हुशारीची चुणूक तेव्हाच दिसली. बेळगावला दमनीतून सिनेमाला नेत असत. सिनेमाहून आल्यावर खूप दिवस काठीने तलवारीची लढाई, पावनखिंड लढविणे चाले. शेवटी मावळ्यांना माँसाहेब शांत करीत. १९४२च्या फेब्रुवारीत आम्ही बदलीमुळे नाशिकला आलो. खात्याची परीक्षा पहिल्या क्रमांकाने पास झाल्यामुळे वडिलांना बढती मिळाली होती. गंगापूर रोडवर कुलकणीर्ंच्या बंगल्यात रहात होतो. शाळेत असल्यापासून शरदला वाचण्याची आवड निर्माण झाली. नाशिकच्या रुंगठा हायस्कूलमध्ये हुशार विद्याथीर् म्हणून त्याची ख्याती होती. शरदचे संस्कृत, मराठी, इंग्रजी, नंतर पुढे फ्रेंच अशा वेगवेगळ्या भाषांतील अनेक विषयांवर वाचन चालू असे. त्याच्या संग्रहात नवनवीन पुस्तके असतात. त्याच्यामुळेच मला इतर वाचनाची गोडी लागली. त्याचे पाठांतर खूप, त्यामुळे सर्वजण जमलो की भेंड्यांची रंगत वाढे. शरदचे एक वैशिष्ट्य असे की, इतरांपेक्षा आपले काही वेगळे असावे असे त्याला वाटते. म्हणून नमाताई व मी गाणे आणि बाळ तबला शिकू लागलो. त्यानेही काही शिकावे अशी आईची इच्छा. आईला पेटी वाजवता येई. शरदचा आवाज गोड म्हणून आईने 'शुभं करोति' पेटी वाजवून म्हणायचे म्हटले तर शरदने नकार दिला. त्याचा आवाज चांगला आहे, सूरही आहे; कधीतरी जगमोहन, पंकज मलिक, मुकेश गळ्यातून निघतात, खुशीत असल्यावर. तसेच शिक्षणाचे. सर्वांनी काय सायन्स् आणि आर्ट्स् करायचे, मी कॉर्मस् घेणार म्हणून त्याने सिडनहॅम कॉलेजमधून बँकिंग विषय घेऊन एम्. कॉम. केले. १९४९ साली आम्ही नाशिकहून मुंबईला आलो. विलेपार्ल्याला टिळक विद्यामंदिरमध्ये शिकत असताना बाळशी झालेली वादावादी, भांडण व मिळालेला मार यामुळे अपमान व अन्याय वाटून शरद रागाने घरातून निघून गेला होता. वडिलांनी इगतपुरीहून त्याला शोधून आणले. तो प्रसंग आठवला की, हृदयात अजून कालवाकालव होते. शरद अत्यंत प्रेमळ व कुटुंबाबद्दल माया असणारा आहे. त्याला उगीच भांडणतंटा आवडत नाही. मदत करायला तो तयार असतो. बहिणींवर खूप माया आणि भाचरे लहान असताना तर कौतुक विचारूच नका. त्यांना खेळवणे, त्यांना बोलायला शिकवणे त्याला फार प्रिय. अंधेरीला संयुक्त महाराष्ट्राच्या निदर्शनांमध्ये भाग घेऊन माझ्या मुलाला 'ङ्खद्ग ष्ठद्गद्वड्डठ्ठस्त्र क्चश्ाद्वड्ढड्ड४' असे बोलायला त्याने शिकवले होते. शिकणे झाल्यावर शरद कोल्हापूरच्या कॉलेजमध्ये शिकवीत असे. लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तम रितीने क्रमांकाने पास झाल्यावर फॉरेन पोस्ट ऑफिसमध्ये त्याची नेमणूक झाली. स्वित्झर्लंडला राहून हिंदुस्थानात परत आल्यावर त्याच्या बुद्धीने एक वेगळीच झेप घेतली. शेतीविषयक त्याला आलेल्या अनुभवाने शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण त्याला आली. शेतकऱ्यांच्या दारिद्याचे मूळ त्याच्या ध्यानात आले व त्याने शेतकरी संघटनेची स्थापना केली. आणि गेली ३५ वषेर् तो त्या कामात गढून गेला आहे. सर्व महाराष्ट्र त्यासाठी पिंजून काढला आहे व शेतकऱ्यांना आत्मसन्मानाचे बळ दिले ते सर्वश्रुतच आहे. कुणालाही अभिमान वाटावा असे हे भव्य नेत्रदीपक काम आहे. मग माझा धाकटा भाऊ एक नवा विचार घेऊन हे वाण घेऊन लढतो आहे हे ऐकून, वाचून व प्रत्यक्ष पहाण्याचे भाग्य मिळाल्याने मी स्वत:ला सुदैवी समजते. हे यश त्याच्या स्वत:च्या कर्तबगारीचे आहे. शरदजवळ प्रचंड ऊर्जा आहे. स्वत:ला शिस्त लावून वाचन, विचार, चिंतन यासाठी काही ऊर्जा वापरून त्याने एका नव्या विचाराला चालना दिली. मराठीमध्ये अत्यंत सोप्या भाषेत लिहून अर्थशास्त्राचे नियम, अनेक संकल्पना व कायदे यांचे अर्थ स्पष्ट करून सांगितले आहेत. त्याच्या लिहिण्याने अनेक नवीन शब्दप्रयोग रूढ झाले. 'इंडिया भारत' हे गृहीतक रूढ झाले. 'भीक नको, हवे घामाचे दाम', 'शेतकरी तितुका एक एक' यांसारखे अनेक शब्दप्रयोग संघटनेत वापरले जातात ते समर्पकच आहेत. शरदच्या ऊजेर्चा दुसरा वापर म्हणजे शारीरिक हालचाल. चालणे, डोंगर चढणे याचा त्याला छंद आहे. स्वित्झर्लंडमध्ये असताना तो आल्प्स पर्वतावर गिर्यारोहणासाठी जाई. आंबेठाणजवळील भामचंदाचा डोंगर तर त्याने अनेकदा वेगवेगळ्या वाटांनी पायाखाली घातला. त्याने नर्मदा परिक्रमाही जवळजवळ पुरी केली. त्याच्या अशा कार्यक्रमांमुळे त्याच्या विचाराला चालना मिळते असे दिसते. एक पांढरपेशा घरातील सुशिक्षित मनुष्य, शेतीचा पूर्वानुभव नसणारा, शेतीसंबंधी नवा विचार मांडतो, त्यासाठी काम करतो आणि ते ऐकायला लाखोंच्या संख्येने शेतकरी भाऊ आणि बायका त्यांच्या पोराबाळांसह चालत, कोणत्याही मार्गाने, डोक्यावर गठुडं घेऊन येतात व डोळ्यात प्राण घेऊन बोलणे ऐकतात असा अमरावती जनसंसदेचा करिष्मा मी अनुभवला आहे. मला धन्य वाटले. आम्हा भावांबहिणींपलीकडे शरदच्या कुटुंबाचा परीघ आता विस्तारला आहे. त्यात सर्व शेतकरी स्त्रिया व त्यांचे कुटुंबीय येतात. शेती कसण्यात बरोबरीने भाग घेणाऱ्या स्त्रियांसाठी शरदने शेतकरी संघटनेची महिला आघाडी स्थापन केली. लक्ष्मीच्या नावाने शेतीचा अर्धा वाटा देण्याची योजना, माजघर शेती, दारूची दुकाने बंद करणे, पंचायतीमध्ये निवड झाल्यावर काम करणे इत्यादी कार्यक्रम शेतकरी संघटनेचा बिल्ला लावलेल्या महिला समर्थपणे करतात. संघटनेद्वारे एक नवा विचार ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पोहोचल्यावर अनेक महिला आपणहून काम करण्यास पुढे आल्या. 'आम्हाला नवी दृष्टी मिळाली, जगण्याची दिशा मिळाली' असे त्या सांगतात. आणि त्या उत्साहाने कार्यक्रमात भाग घेतात. निवडणुकीद्वारे महिला आघाडीमध्ये नवीन अध्यक्षा येतात व कार्यानुभव वाढतो ही लोकशाही. माझ्या परिचयामध्ये सरोजताई, शैलाताई, मायाताई, शोभाताई अशा अनेक आहेत. माझ्यापेक्षा बहिणीची भूमिका त्या तत्परतेने पार पाडतात. वयानुसार शरद अलीकडे थोडा बदलला आहे, थोडा भावुक होऊ लागला आहे. धर्मकांड न मानणारा शरद वेदान्ताकडे नवीन दृष्टीने पाहू इच्छितो. हे एक नवे आव्हान, पण त्यामधून एक नवी दृष्टी नक्कीच मिळेल. असा हा माझा भाऊ. वयाची ७५ वषेर् पुरी होऊन गेली. आरोग्यपूर्ण आयुष्य लाभून त्याच्या उर्वरित आयुष्यात त्याच्या स्वप्नांची पूतीर् पहाण्याचे भाग्य त्याला लाभो हाच आशीर्वाद. |
No comments:
Post a Comment